Join us

‘डेब्रिज’लाही 5 लाखांचा दंड! पालिकेची कारवाई; वाहने झाका, मालाच्या प्रमाणाचे नियम पाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 12:12 PM

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या गाड्यांवर पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने केवळ मार्गदर्शक सूचनाच जाहीर केल्या नाहीत, तर त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. बांधकाम - पाडकामाचा राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला असून, ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान अशा वाहनांकडून एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या गाड्यांवर पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि धूळ व धूर नियंत्रणासाठी पालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असायला हवीत जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. याशिवाय वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य घेऊन जाऊ नये, जेणेकरून ते पडण्याचा धोका राहणार नाही.

 कोणत्या विभागात किती दंड दोन दिवसांत राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड तीन दिवसांत वसूल करण्यात आला आहे. यामध्ये जी दक्षिण विभागात १५ हजार रुपये, पी उत्तर विभागात ८० हजार रुपये, एन विभागात ७० हजार रुपये, एस विभागात ४५ हजार ६९२ रुपये, टी विभागात ५० हजार रुपये, पी दक्षिण विभागात १३ हजार रुपये, के पश्चिम विभागात १० हजार रुपये, एफ उत्तर विभागात ४५ हजार रुपये, जी उत्तर विभागात १० हजार रुपये असा एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड रकमेचा समावेश आहे.

गाडी धुवा,नंतरच वापराप्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी, परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा हा पालिकेच्या सूचनेनुसार नेमून दिलेल्या ठिकाणीच नेला जावा. तसेच राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात विशेष पथके ही नियुक्त करण्यात आली आहेत.

पालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना सर्व यंत्रणांसाठी असून, त्यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जावे. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरू राहणार आहे.  - इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका 

टॅग्स :मुंबई