स्वकष्टाने उभारला बगिचा
By admin | Published: June 25, 2016 02:20 AM2016-06-25T02:20:52+5:302016-06-25T02:20:52+5:30
जागतिक पर्यावरण असमतोलाच्या पार्श्वभूमीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी ओरड होत असताना, जुनी प्रभादेवी परिसरातील संजय सावंत याने स्वकष्टाने बगिचा उभारून आदर्श निर्माण केला आहे
रोहित गुरव, मुंबई
जागतिक पर्यावरण असमतोलाच्या पार्श्वभूमीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी ओरड होत असताना, जुनी प्रभादेवी परिसरातील संजय सावंत याने स्वकष्टाने बगिचा उभारून आदर्श निर्माण केला आहे. दहा बाय दहाच्या घरात राहणाऱ्या संजयने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, घराजवळील निरुपयोगी जागेत हे नंदनवन फुलविले आहे.
संजयचे घर असणाऱ्या गल्लीच्या टोकाला असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याशेजारील संरक्षण दगडांची किनार आणि घर यांच्यात जवळपास १८० स्क्वेअर फुटांची जागा आहे. पूर्वी या असमतोल जागेत लोक कचरा टाकत होते. दोन वर्षांपूर्वी या जागेत झाडे लावण्याचा संजयने निर्धार केला. त्यासाठी आवश्यक खुरपणीचे हत्यार, फवारणी पंप ही साधने स्वत: विकत घेतली. नेमाने या जागेत राबून बगिचा उभा केला. पूर्वी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे दुर्लक्षिलेल्या या भागात आता फुलझाडांचा सुगंध दरवळतो आहे.
संजयने उभारलेल्या या बगिचामध्ये पेरू, चिकू, पपई, केळी, नारळ, जास्वंद, अनंत, तगर, रातराणी, सदाफुली, गुलाब, चाफा, सोनचाफा, शेगुळ, अडसुळ, कोरफड, तुळस व शोची झाडे आदी फळाफुलांच्या व औषधी वनस्पतींच्या विविध ५०पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
त्यातील पपई, शेगूल या फळझाडांना फळे लागली आहेत, तर बरीच फुलझाडे बहरली आहेत. या वसाहतीतील अनेकांनी आता संजयचा आदर्श ठेवत, झाडे लावायला सुरुवात केली आहे.
यंदा टोमॅटो, काकडी, कारली लावणार...
दोन वर्षांपूर्वी या निरुपयोगी जागेला स्वच्छ करून वीट, दगडांची भरणी घातली. त्यावर लाल माती आणि वाळूने समांतर जमिनीचे स्वरूप आणले. त्यानंतर, जागेत रोपटी लावायला सुरुवात केली. मात्र, पावसाळ्यात वाऱ्याने बरीच रोपटी उन्मळून पडली. शिवाय, काहींनी या सगळ्याला विरोध करीत नकळत झाडे उखडून टाकली, पण निर्धार केल्याप्रमाणे नित्यनेमाने पुन्हा रोपटी लावली, त्यांना वाढविले, संरक्षण दिले.
‘आता झाडांच्या आवश्यकतेनुसार, पंधरवड्यातून एकदा खतपाणी आणि फवारणी करतो. पावसाने जोर धरला की, यंदा टोमॅटो, कारली, काकडी या झाडांची बियाणे रुजविणार आहे,’ असेही संजयने आवर्जून सांगितले.