मुंबईतील उद्याने आता १२ तास खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 06:24 AM2018-09-22T06:24:45+5:302018-09-22T06:24:48+5:30
मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मोकळी मैदान, उद्याने हेच मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरते.
मुंबई : मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मोकळी मैदान, उद्याने हेच मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरते. मात्र, उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, तसेच काही उद्याने संध्याकाळी लवकर बंद होत असल्याने मुंबईकरांना उद्यानात जात येत नव्हते. याची दखल घेऊन उद्याने सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ अशी दररोज १२ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे नागरिकांना उद्यान व खेळाच्या मैदानांची सुविधा देण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. मुंबईत महापालिकेची सुमारे ७५० उद्याने आहेत. ही उद्याने रविवार, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही खुली ठेवण्यात येतात. मात्र, या उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळा आतापर्यंत वेगवेगळ्या होत्या. सर्व उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळांमध्ये सुसूत्रता यावी, या हेतूने ही उद्याने रोज १२ तास खुली ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. उद्यानांमध्ये आवश्यक दैनंदिन पाहणी व देखभाल दुपारी १२ ते ३ या कालावधीत प्राधान्याने करण्यात येईल. उद्यानांच्या वेळेत झालेल्या या बदलांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी उद्यानांच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचे फलक तातडीने लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोकळी हवा व विरंगुळ्याचे आणखी काही तास सहकुटुंब अनुभवता येतील.