Join us  

दादरमधील उद्याने उजाड, झाडांना पाणी नाही

By admin | Published: May 03, 2017 6:39 AM

दादरमधील बहुतेक उद्याने ऐन सुट्टीच्या दिवसांत उजाड झाली आहेत. उद्यानांमधील खेळाच्या साहित्यासह खुल्या

मुंबई : दादरमधील बहुतेक उद्याने ऐन सुट्टीच्या दिवसांत उजाड झाली आहेत. उद्यानांमधील खेळाच्या साहित्यासह खुल्या व्यायामशाळांचे साहित्यही मोडकळीस आले असून, या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही मंबई महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे मैदान बचाव समितीने सांगितले.दादरमध्ये वसंत प्रभू उद्यान, दीनानाथ दलाल उद्यान, केशवराव दाते उद्यान, पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यान, तसेच संत ज्ञानेश्वर उद्यानात सुट्टीच्या दिवसांत तुफान गर्दी होते. मात्र, ही उद्याने कर्मचाऱ्यांविना उजाड झाली असून, येथील मनोरंजनाची साधनेही तुटली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेकडून उद्यानांची देखभाल केली जात नाही. परिणामी, येथील हिरवळीसह उर्वरित घटकांची दैना झाल्याचे समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतर उद्यानांमध्ये हिरवळ बहरते, याउलट उद्यानांमधील झाडांना दररोज योग्य वेळी पाणी न दिल्याने आॅक्टोबरनंतर अनेक रोपटी मरण पावतात. दादरमधील बहुतेक उद्यानांत कर्मचारी नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानाची सर्वांत वाईट अवस्था आहे. या उद्यानामधील खेळाचे साहित्य तुटलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहे. उद्यानात झोपाळाच्या जागेवर खांब तर आहेत. मात्र, त्यातील साखळीसह झोपाळाच गायब आहे. घसरगुंडी आहे. मात्र, घसरगुंडीमधील पत्रा गंजलेला आहे. लहान मुलांना त्यावरून खेळताना इजा होण्याची शक्यता असल्याने पालकही मुलांना उद्यानात सोडत नाहीत. उद्यानातील झाडांना रोज पाणी घातले जात नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाने या घसरगुंड्यांचा पत्रा दुरुस्त करावा अथवा उद्यानामध्ये नवी घसरगुंडी बसवावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. उद्यानातील पाणपोईचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. प्रसाधनगृह वापरायोग्य नाही.उद्यानातील झाडांची निगा राखण्यासाठी उद्यानांमध्ये देखभाल कर्मचारी असणे अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष आणि वेलींची योग्य छाटणी करून उद्याने सुंदर करता येऊ शकतात. हँगिंग गार्डन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्याप्रकारे प्रशासनाने हँगिंग गार्डनची जोपासना केली आहे, तसे शहरात इतर उद्यानांमध्ये होताना दिसत नाही.- भास्कर सावंत, अध्यक्ष, मैदान बचाव समितीउद्यानांच्या विकासासंदर्भात उद्यान विभागाशी बोलणे झाले आहे. उद्यान विभाग याबाबत सकारात्मक आहे. मी काही उद्यानांची यादी उद्यान विभागाकडे सुपुर्द केली आहे. येत्या सहा महिन्यांत सगळी उद्याने दुरुस्त केली जातील.- भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त, जी दक्षिण विभाग