गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:01 AM2024-05-13T10:01:19+5:302024-05-13T10:02:37+5:30

बाधितांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार.

gargai project approval of dam saftey committee in mumbai a plan for the rehabilitation of the affected is prepared | गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी 

गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी 

मुंबई : मुंबई शहराची दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची गरज वाढली असून, ती भागवण्यासाठी प्रस्तावित गारगाई धरणातून मुंबईला पाणीसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे धरण बांधल्यानंतर दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी त्यातून मिळणार आहे. सध्या या धरणाला राज्य सरकारच्या अखत्यारीतील नाशिक धरण सुरक्षा समिती व केंद्रीय वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप राज्याच्या वन विभागाची परवानगी बाकी आहे. 

मुंबईला मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांतून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र, मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी महापालिका गारगाई धरण बांधणार आहे. 

वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. एम.ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राधान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला सरकारच्या १२ नोव्हेंबर २०१३ च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे. दरम्यान, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, तर प्रकल्पबाधितांना त्यांच्या घराजवळच पर्यायी घरे देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

पालिकेकडून मुंबईकरांसाठी गारगाईसह पिंजाळ आणि दमणगंगा, असे एकूण तीन नवीन जलप्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी प्रति दिन वाढीव २,८९१ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

असा आहे प्रकल्प -

 नियोजित गारगाई धरण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोऱ्याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे २ किमी लांबीच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.

दोन किलोमीटरचा बोगदा-

गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. मात्र, या प्रकल्पातून मुंबईत पाणी आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज नाही. उपलब्ध असलेल्या यंत्रणेमधूनच हे पाणी मुंबईत आणले जाईल. मोडकसागर धरणाला जोडण्यासाठी केवळ दोन किमीचा बोगदा तयार करण्याचा खर्च येणार असल्याचे बांगर म्हणाले. 

Web Title: gargai project approval of dam saftey committee in mumbai a plan for the rehabilitation of the affected is prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.