मुंबई - राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्याकडे निवडून कुणीही येत नाही. राज यांच्या सभेनं करमणूक होते, पण रिझल्ट काय? नाशिकची महापालिका त्यांच्याकडे होते, काय करुन दाखवलं?, असे म्हणत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज यांच्या सभांची खिल्ली उडवली आहे. नाशिक नगरपालिकेत त्यांची सत्ता होती, आता केवळ 2 नगरसेवक निवडून आले आहेत. यावरुन लक्षात येईल, केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं. कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कुणीही मानत नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंकडे एक आमदार होता, तोही सोडून गेला. आता, लाव रे व्हीडिओ एवढच काम राज ठाकरेंना उरलंय. आपण कुठंय अन् बोलतो कुणाबद्दल, कुठे मोदीजी, कुठे सीएम, अशा शब्दात गरिश महाजन यांनी राज ठाकरेंच्या व्हीडिओवरील भाषणाचा समाचार केला. ते आवाज काढतात, क्लीप दाखवतात यातून लोकांची करमणूक होते. व्हीडिओबद्दल बोलायंच झालं तर, आम्हीही त्यांचे जुने व्हीडिओ काढून दाखवले तर? मोदींची स्तुती करताना राज ठाकरे थकत नव्हते. मग, आम्हीच प्रश्न विचारतो, एक माणूस एवढा बदलूच कसा शकतो ? असे म्हणत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला. तसेच राज ठाकरेंच्या सभांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, उलट ते जेथे सभा घेतात, तेथे आमचाच उमेदवार निवडून येईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सभांचा धडका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज हे प्रचार सभा घेत भाजपला झोडपून काढत आहे. राज यांच्या सभेला माध्यमांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. त्यातून भाजप नेत्यांकडून मनसेच्या सभांवर टीका केली जात आहे. तसेच भाजपाला या सभांचा काहीही तोटा होणार नसल्याचंही सांगण्यात येत आहे. भाजपाकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यानंतर आता, गिरीश महाजन यांनीही राज ठाकरेंच्या ए लाव रे तो व्हीडिओची खिल्ली उडवली आहे.