मुंबई/सांगली : अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकऱ्यांचेही नुकसान करायचे, असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडताहेत. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकर यांनी टिपू सुलतान यांचा फोटो वापरण्यास विरोध केल्यावरुनही पोलीस व सरकारवर जोरदार प्रहार केला.
सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना, धार्मिक मुद्द्यावरही भाष्य केले. व्यासपीठावर टिपू सुलतान यांचा फोटो ठेवण्यात आला होता. त्या, फोटोस पुष्पहार घालून त्यांनी भाषणातून पोलिसांना इशाराच दिला.
टीपू सुलतान यांचा फोटो वापरु नये, तसेच त्या फोटोला हार घालू नये, असे पोलिसांकडून सभेच्या संयोजकांना सांगण्यात आले होते. मात्र, आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांनी दिले. तसेच, तुम्हाला सत्तेनुसार आणि कायद्यानुसार वागायचे असते. आत्तापर्यंत आम्ही निवडणुकांतून थेट सत्तेत कधीच प्रवेश केला नाही. मात्र, आता आम्ही सत्तेत असणार आहोत, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
हिंदूंवरुन नरेंद्र मोदींवरही निशाणा
आंबेडकर म्हणाले की, भारतात १९५० ते २०१४ या ६४ वर्षाच्या काळात ७ हजार ६४४ भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. स्वतःला हिंदू रक्षणकर्ते समजणाऱ्या मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या कालावधीत १४ लाख भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले, ईडीची भीती दाखवून आपली संपत्ती व इभ्रत लुटली जाईल, याची भीती या कुटुंबांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर केले.