मुंबई : यंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्र लवकरच गारठणार असून, मुंबईचे किमान तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशांच्या खाली घसरणार आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरसारखा गारठा अनुभवता येईल. २० डिसेंबरपासून थंडी आणखी वाढणार असून त्यावेळी बहुतांश ठिकाणी तापमान ५ अंशांपेक्षा खाली घसरेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मुंबईबरोबरच पुण्याचा पाराही ७ अंशांखाली, नागपूरचा ५ अंशांखाली, तर नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठू शकेल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमान सर्वात जास्त खाली येईल, असे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले.