गारवा वाढतोय; साखरझोपेतील मुंबईकरांना हुडहुडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:30 AM2020-01-04T04:30:54+5:302020-01-04T06:49:52+5:30
कमाल तापमानात घसरण; तीन दिवसांपासून किमान तापमानही २० अंशांच्या खाली
मुंबई : मुंबईकरांना डिसेंबर महिन्यात हुलकावणी दिलेल्या थंडीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला हुडहुडी भरवली आहे. एकीकडे मुंबई दिवसेंदिवस प्रदूषित नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे मात्र गारठा वाढविणाऱ्या थंडीने साखरझोपेतल्या मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरवली आहे. मुंबापुरीतल्या वाढत्या गारठ्यामुळे कपाटात घड्या करून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या, रग, गोधडी आता बाहेर पडत असून, मुंबईकरांच्या डोक्यावर घोंगावणाऱ्या पंख्याच्या पातीचा वेगही मंदावला आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच थंडीने मुंबईत मुक्काम केला आहे. तप्त दुपार वगळता सकाळ, संध्याकाळसह रात्री वाहणारे गार वारे थंडीत आणखी भर घालत आहेत. लोकलच्या दरवाज्यावर लटकणाºया मुंबईकरांना गारव्याचा सुखद अनुभव घेता येत आहे. लोकलच्या डब्यातील पंखेही, तसेच खिडक्यांची तावदानेही रात्रीच्या वेळेस बंद केली जात आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवासी कानटोप्या, स्वेटरचा आधार घेत असून, नाकाबंदीवरील मुंबई पोलीसही स्वेटरसह कानटोप्यांचा आधार घेत, आपले कर्तव्य बजावित आहेत. या व्यतिरिक्त दादरच्या मार्केटमध्ये रात्री उशिरासह भल्या पहाटे साहित्य विक्रीसाठी दाखल होणारे विक्रेतेदेखील उबदार कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मागील तीन दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असून, कमाल तापमानही २५ अंशाच्या खाली घसरले आहे. उत्तरोत्तर कमाल आणि किमान तापमानात होणारी घट थंडीत आणखी भर घालत आहे.
मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा
४ ते ६ जानेवारी : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
७ जानेवारी : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
४ आणि ५ जानेवारी : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १५ अंशाच्या आसपास राहील.
मुंबई ‘ड्राय अॅण्ड कूल’
मुंबईच्या कमाल तापमानात शुक्रवारी घट नोंदविण्यात आली. सांताक्रुझ येथे कमाल तापमानाची नोंद २७.८ तर कुलाबा येथेही २७.२ अंश सेल्सिअस एवढी झाली असून, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी मुंबईतील हवामान ‘ड्राय अँड कूल’ म्हणजे कोरडे आणि थंड होते.
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई १६.६
पुणे १२.३
जळगाव १५.६
कोल्हापूर १६.२
महाबळेश्वर ११.५
मालेगाव १५.५
नाशिक ११.२
सांगली १५.१
सातारा १३.१
उस्मानाबाद १२.४
औरंगाबाद १३.६
नांदेड १६
अकोला १६.२
अमरावती १५.२
बुलढाणा १५.८
ब्रहमपुरी १३.६
चंद्रपूर ७.६
गोंदिया १४.४
नागपूर १५.५
वाशिम १५.२
वर्धा १६.६
यवतमाळ १४.४