लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरघुती गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक. पण गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णवाढीच्या आलेख प्रमाणे घरघुती गॅसचे दरही वाढत गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. चालू महिन्यात गॅस २५ रुपयांनी महागला असून, दर ८५९.५० रुपयांवर पोहोचले आहेत.
उज्ज्वला गॅस योजनेमुळे शहरांसोबतच ग्रामीण भागातही सिलिंडरची मागणी वाढली आहे. मात्र, गॅसचे दर दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांना कोरोना संकट बरोबरच अर्थसंकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षीपासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सिलिंडर लवकरच हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्याने ही दरवाढ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
..............
आठ महिन्यांत १६५ रूपयांची वाढ
महिना दर (रुपयांत)
जानेवारी ६९४
फेब्रुवारी ७६९
मार्च ८१९
एप्रिल ८०९
मे ८०९
जून ८०९
जुलै ८३४.५०
ऑगस्ट ८५९.५०
...........
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
घरघुती गॅसचे दर टप्प्याटप्प्याने वाढत गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारकडून १२ सिलिंडवर मिळणाऱ्या सबसिडीमुळे ग्राहकांना थोडाफार आधार मिळायचा. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत रक्कम ‘डायरेक्ट बेनिफिट’च्या माध्यमातून थेट खात्यात जमा होत होती. पण गेल्या एप्रिल महिन्यापासून अनुदानाचा एकही रुपया मिळाला नसल्याचे काही ग्राहकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
...............
५ आणि १९ किलो सिलिंडर झाला स्वस्त
गॅस एजन्सी मार्फत ५ किलो वजनाचे छोटे सिलिंडर, १४.२ किलो वजनाचे घरगुती आणि १९ किलो वजनाचे व्यावसायिक सिलिंडर ग्राहकांना पुरविले जातात. सध्या घरगुती सिलिंडरच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या असून, व्यावसायिक सिलिंडरचे दर ५ रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच ५ किलो वजनाच्या सिलिंडरचे दर ४९१.५० वरून ४८९ रुपयांवर आले आहेत.
.............
लॉकडाऊनमुळे घरातील दोघा कमावत्या व्यक्तींचा रोजगार गेला. लहान मुलगा थोडेफार पैसे कमावतो, पण त्याच्यात घरखर्च भागविणे कठीण आहे. इंधन दरवाढीमुळे आधीच जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यात गॅस महागल्याने खायचे काय, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.
- सुलभा गवस, गृहिणी, चांदिवली
...............
केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्यांची चिंता नाही हे यावरून दिसून येते. इंधनावर अधिभार लावून शासन आपले उत्पन्न वाढवू पाहत आहे. पण यामुळे गरिबांच्या खिशाला भगदाड पडत आहे, याकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. महागाई आवाक्यात न आल्यास पुढील काळात हातावर पोट असणाऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय नाही.
- वर्षा पाटील, गृहिणी, मालाड