लग्नावेळी गॅस लीक झाल्याचे कळले, सारे तिकडे धावले; तिथेच घात झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:50 PM2020-12-06T13:50:50+5:302020-12-06T13:51:29+5:30
Gas cylinder Blast in Lalbag : गणेश गल्लीतील साराभाई बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली. जखमींना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात जाऊन पेडणेकर यांनी जखमींची विचारपूस केली.
मुंबई : मुंबईच्या लालबागमधील गणेश गल्लीत आज सकाळीच गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले आहेत. या घरामध्ये लग्नसमारंभ होता. यावेळी गॅस लीक झाल्याचे कळताच घरातील सर्वांनी त्याकडे धाव घेतली. इथेच मोठा घात झाला. अचानक गॅस सिलेंडरचास्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या जखमींची चौकशी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
गणेश गल्लीतील साराभाई बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली. जखमींना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात जाऊन पेडणेकर यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच तातडीने सर्वतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. यानंतर त्यांनी घटनास्थळाला सुद्धा भेट दिली. यावेळी आमदार अजय चौधरी, स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख, डॉ.बांगर उपस्थित होते.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar visits King Edward Memorial (KEM) hospital to meet the people who were injured in Lalbaug area's cylinder blast today. https://t.co/Hw3DD7VgyKpic.twitter.com/DOFNkQOtl7
— ANI (@ANI) December 6, 2020
यानंतर पेडणेकर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ज्यांच्या घरी गॅस दुर्घटना झाली आहे त्यांच्याकडे लग्न विधी सुरू होते.अचानक गॅस लिकेज होत असल्याचे कळल्यानंतर घरातील सर्वांनी त्याकडे धाव घेतली असता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोळा जण जखमी झाले असून बारा जणांना केईएम रुग्णालयात तर चार जणांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केईएममध्ये युद्धपातळीवर सर्व जखमींवर उपचार सुरू असून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू न देता औषध उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
याचबरोबर क्षतीग्रस्त झालेल्या घराची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.