मुंबई : मुंबईच्या लालबागमधील गणेश गल्लीत आज सकाळीच गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले आहेत. या घरामध्ये लग्नसमारंभ होता. यावेळी गॅस लीक झाल्याचे कळताच घरातील सर्वांनी त्याकडे धाव घेतली. इथेच मोठा घात झाला. अचानक गॅस सिलेंडरचास्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या जखमींची चौकशी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
गणेश गल्लीतील साराभाई बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली. जखमींना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात जाऊन पेडणेकर यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच तातडीने सर्वतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. यानंतर त्यांनी घटनास्थळाला सुद्धा भेट दिली. यावेळी आमदार अजय चौधरी, स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख, डॉ.बांगर उपस्थित होते.
याचबरोबर क्षतीग्रस्त झालेल्या घराची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.