घरात ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ बसवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:44 AM2018-09-10T02:44:52+5:302018-09-10T02:44:56+5:30
गॅस गळती स्वयंचलित पद्धतीने शोधून, त्याची सूचना देणारे अत्याधुनिक ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे.
मुंबई : गॅस गळती स्वयंचलित पद्धतीने शोधून, त्याची सूचना देणारे अत्याधुनिक ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे. परवानगीनुसार गॅस सिलिंडरचा साठा असलेल्या ठिकाणी, तसेच गॅस शेगडीच्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने गॅस लिकेज डिटेक्टर बसवावे, अशा सूचना महापालिकेने मुंबईकरांना दिल्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने विद्युत जोडणी व विद्युत उपकरणे, एल.पी.जी. सिलिंडर, पाइप नॅचरल गॅस, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड यासारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आणि आनुषंगिक नियम, सूचना इत्यादींची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
वजनानुसार एल.पी.जी. सिलिंडरचे सामान्यपणे ३ प्रकार आहेत. यामध्ये १४.२ किलो, १९.२ किलो व ४५ किलो यांचा समावेश आहे. या सर्वच सिलिंडरचा साठा व वापर करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून व अधिकृतपणेच खरेदी करावे. सिलिंडर घेतानाच त्यात लिकेज नसल्याची खातरजमा गॅस कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून करवून घ्यावी. गॅस लिकेजची खातरजमा करूनच गॅस सिलिंडर देणे, हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीलादेखील बंधनकारक आहे, याची आवर्जून नोंद घ्यावी.
>ही खबरदारी घ्या! दरवाजे-खिडक्या उघडा
गॅसचा पाइप रबराचा असल्यास तो २ मीटरपेक्षा अधिक लांबीचा नसेल, याची काळजी घ्यावी.
आपल्या व्यवसायाच्या ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण करताना, गॅस जोडणीचे अधिकृत तंत्रज्ञाकडून परीक्षण करवून घ्यावे व तसे परीक्षण केल्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या संबंधित विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करावे. गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यास, तातडीने शटआॅफ व्हॉल्व/रेग्युलेटर बंद करावे. दरवाजे-खिडक्या तातडीने उघडाव्यात.
कोणतेही विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा चालू करू नये. तेलाचे दिवे, मेणबत्ती, उदबत्तीसारखे आगीचे इतर स्रोत बाजूला करावेत किंवा विझवावेत, तसेच दारे-खिडक्या तातडीने उघडून खेळती हवा वाढेल व गॅस बाहेर निघून जाईल, असे बघावे.