महिन्याभरात गॅस्ट्रोचे ९२० रुग्ण
By admin | Published: June 4, 2016 02:05 AM2016-06-04T02:05:17+5:302016-06-04T02:05:17+5:30
पावसाळा सुरू झाला की, डासांंमुळे आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. पण यंदा पालिकेला पावसाळ्यात पसरणाऱ्या साथींच्या आजारांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे
मुंबई : पावसाळा सुरू झाला की, डासांंमुळे आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. पण यंदा पालिकेला पावसाळ्यात पसरणाऱ्या साथींच्या आजारांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण, मे महिन्यातच गॅस्ट्रोचे ९२० तर मलेरियाचे ४१५ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे.
पावसाळा सुरू झाला की, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ अशा आजारांचे प्रमाणात वाढते. तर साचलेल्या पाण्यात डासांची पैदास झाल्यामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढतात. यंदा पावसाळा सुरू होण्याआधीच साथीच्या आजारांचे रुग्ण मुंबईत आढळून आल्याने यंदाच्या पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.
महापालिकेने मे महिन्यात केलेल्या पाण्याच्या सर्वेक्षणात ९२ टक्के पाण्यात ईकोलायचे जंतू आढळून आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर दूषित पाणी येऊ शकते. असे दूषित पाणी मुंबईकरांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी पाणी उकळून, गाळून प्यावे. बाहेरचे रस्त्यावर शिजवले जाणारे पदार्थ, पेये टाळली पाहिजेत. नाही तर पाण्यामुळे होणारे आजार पावसाळ्यात डोके वर काढू शकतात.
मे महिन्यात कावीळचे १३५, टायफॉइडचे ११३, डेंग्यूचे २७, कॉलराचे २, लेप्टोचे २ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)