मुंबईत तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे दोन हजार १४४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:54 AM2019-04-09T05:54:53+5:302019-04-09T05:55:06+5:30

साथीच्या आजारांनी डोके वर काढले : पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

Gastro has 144 patients in three months | मुंबईत तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे दोन हजार १४४ रुग्ण

मुंबईत तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे दोन हजार १४४ रुग्ण

Next

मुंबई : शहर-उपनगरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल असून खासगी रुग्णालयांतूनही उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. तीन महिन्यांमध्ये दोन हजार १४४ रुग्ण आढळल्याचे पालिकेने सांगितले. हे आजार दूषित पाण्याच्या वापरामुळे होत आहेत.


पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मलेरियाचे ४६४, काविळीचे २७६, स्वाइन फ्लूचे १२१, लेप्टोचे १७ आणि डेंग्यूचे ४४ रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीत खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दूषित व अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, शिळे अन्न खाणे, उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन यामुळे गॅस्ट्रो होतो. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. विहिरीतील पाण्याची खोल गेलेली पातळी व त्यामुळे दूषित पाण्याचा वापर काही ठिकाणी नागरिकांना करावा लागत आहे. त्याचा परिणामही नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी सांगितले की, पाणी साठविणे, शीतपेयांचे वाढते सेवन, बर्फ यामुळे दूषित पाणी शरीरात जात आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन साथीच्या आजारांचा विळखा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
बदलत्या वातावरणात मुंबईकरांनी अधिक काळजी घेणे गरजेचे
आहे.

अशी घ्या काळजी...
पाणी उकळून व गाळून पिणे. घराबाहेर जाताना व सहलींच्या वेळीही पाण्याची बाटली सोबत ठेवावी. रस्त्यावरील बर्फाचा वापर केलेले थंड पेय, बर्फाचा गोळा खाऊ नये. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना विक्रेत्यांचे हात स्वच्छ आहेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी किंवा विक्रेत्याला हातमोजे घालण्याचा सल्ला द्यावा.
च्मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे. पाणी उकळून थंड झाल्यावर फार काळ तेच पाणी पिणे टाळावे. उलट्या व जुलाब त्रास होत असल्यास साखर आणि लिंबू घातलेले सरबत, इलेक्ट्रॉल वा ओआरएस घेता येईल. या आजारात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचावयास हलके अन्नपदार्थ खावेत.
च्अशा वेळी ताक, दही, मुगाची कमी मसाल्याची खिचडी, भाताची पेज चालू शकते. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. वापरण्यापूर्वी पालेभाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्या. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यातून होत असल्याने घरात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्या व्यवस्थित स्वरूपात आहेत की नाहीत याची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Gastro has 144 patients in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य