उघड्यावरील पदार्थ देत आहेत गॅस्ट्रोला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:48 AM2017-08-11T06:48:48+5:302017-08-11T06:48:48+5:30
डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूसोबत शहर-उपनगरात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. उघड्यावरील पदार्थ, पाणी आणि बर्फामुळे हा आजार बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मुंबई : डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूसोबत शहर-उपनगरात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. उघड्यावरील पदार्थ, पाणी आणि बर्फामुळे हा आजार बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१७च्या एप्रिल महिन्यानंतर जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी एक हजारचा आकडा पार केला असून सावधानता बाळगत उघड्यावरचे अन्न, पाणी टाळण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईत यंदाच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान गॅस्ट्रोचे दोन हजार २८० रुग्ण आढळले होते. तर १६ ते २२ जून दरम्यान गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून आले. त्याचप्रमाणे, एप्रिल महिन्यात गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण तर जुलै महिन्यात एक हजार १० रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या १६७२ रुग्णांची नोंद झाली होती. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतांसाठी वापरल्या जाणाºया दूषित पाणी आणि बर्फामुळे हा आजार बळावत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
गॅस्ट्रो होण्यामागे रोटा, अॅडेनो किंवा अॅस्ट्रोसारख्या विषाणूंचा तसेच सॅल्मोनेला, शिंगेला, स्टॅफीलोकोकस, कॅम्पिलोबॅक्टर इ. जीवाणूंचा
संसर्ग, आहार किंवा औषधाची प्रतिकूल क्रिया ही सर्वसाधारण कारणे आहेत.
गॅस्ट्रोच्या रुग्णांना आतड्यांना सूज येऊन जुलाब व उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येत असल्याची माहिती साथ रोग कक्ष नियंत्रण प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी ‘लोकमत’ला दिली. डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले की, पावसाळ्यात उघड्यावरील पाणी, पेये, खाद्यपदार्थांना आळा घालून घरच्या ताज्या अन्नावर भर दिला पाहिजे. तसेच पाणीसुद्धा गरम करून प्यायले पाहिजे. शिवाय, लहान मुलांच्या पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
लक्षणे
तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे
पोट दुखणे आणि वारंवार पातळ शौचास होणे
उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे
लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे
उपाययोजना
पाणी उकळून आणि गाळून पिणे, घराच्या परिसरात स्वच्छता राखणे
शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने धुणे, अतिसारावर घरगुती उपाय मीठ-साखरेचे पाणी रुग्णास देणे
रुग्णाच्या आहारात सफरचंद, मऊ शिजलेला भात, दही यांचा समावेश करणे, ७२ तासांच्या आत त्रास न थांबल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे