गॅस्ट्रो, लेप्टो, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत यंदा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:03+5:302021-07-14T04:08:03+5:30
मुंबई - अधुनमधून रिमझिम हजेरी लावणाऱ्या पावसाने मुंबईत साथीच्या आजारांना मात्र आमंत्रण दिले आहे. यामध्ये गॅस्ट्रो, लेप्टो, डेंग्यूचे रुग्ण ...
मुंबई - अधुनमधून रिमझिम हजेरी लावणाऱ्या पावसाने मुंबईत साथीच्या आजारांना मात्र आमंत्रण दिले आहे. यामध्ये गॅस्ट्रो, लेप्टो, डेंग्यूचे रुग्ण मागच्यावर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून येत आहे. गेल्या सहा महिन्यांत सुदैवाने साथीच्या आजारामुळे कोणता रुग्ण दगावलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून नागरिकांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असते. यामध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आणि गॅस्ट्रो या आजारांवर वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू संभवतो. त्यामुळे साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत विशेष खबरदारी घेतली जाते. डासांमुळे मलेरिया व डेंग्यूसारखे आजार असल्याने डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करण्याची कार्यवाही कीटकनाशक विभागामार्फत केली जाते.
गॅस्ट्रो नियंत्रण ठेवण्यासाठी दूषित पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागांतील पाण्याची नियमित तपासणी केली जाते. पाण्यातील प्राण्यांच्या मल-मूत्रापासून लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो. गेल्यावर्षी कोविड काळात महापालिका आणि खासगी रुग्णालयांमधील खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव होत्या. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपासून केईएम, नायर, सायन, कूपर व अन्य पालिका रुग्णालयांमध्ये दीड हजार खाटा साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
सहा महिन्यांत साथीच्या आजारांचा बळी नाही
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रसार वाढतो. यामध्ये काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. गेल्या दीड वर्षापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू आहे. मात्र या काळात साथीच्या आजारांनी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. २०२० मध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर २०१९ मध्ये २० रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सर्वाधिक ११ मृत्यू लेप्टोमुळे झाले होते.
साथीच्या आजारावरील रुग्ण...
जुलै महिन्यातील आकडेवारी....
आजार...२०१९..२०२०...२०२१
१ जाने. ते ३१ डिसेंबर...११ जुलैपर्यंत
मलेरिया...४३८...९५४...२३०
लेप्टो...७४....१४.....१५
डेंग्यू ...२९....११...१२
गॅस्ट्रो.....९९४....५६...१८०