शहरात गॅस्ट्रो-मलेरियाचा धोका
By admin | Published: July 5, 2017 07:00 AM2017-07-05T07:00:50+5:302017-07-05T07:00:50+5:30
जून महिन्यात मुंबईत पाऊस कमी झाला असला तरीही पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून महिन्यात मुंबईत पाऊस कमी झाला असला तरीही पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात मुंबईत गॅस्ट्रोचे तब्बल ८८६ तर मलेरियाचे ४४२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मुंबईतील विविध रुग्णालयांत २४९ डेंग्यूसदृश रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईत गॅस्ट्रोच्या बरोबरीनेच स्वाइनच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. जून महिन्यात स्वाइनचे ३१३ रुग्ण आढळून आले आहेत. लेप्टोचे २०, डेंग्यूचे ३१ आणि काविळीचे ९८ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते जून दरम्यान स्वाइनचे एकूण ४९० रुग्ण आढळून आले आहेत. ५६ टक्के पुरुषांना तर ४४ टक्के महिलांना स्वाइन फ्लू झाला आहे. १५ ते ४४ वयोगटातील अधिक व्यक्तींना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळून आले आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला होता. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.