मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले, दोन महिन्यांत १,२४४ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:29 AM2019-07-16T01:29:33+5:302019-07-16T01:29:41+5:30
मुंबईत पाऊस गायब असला तरी साथीच्या आजारांचे प्रमाण मात्र वाढत आहे.
मुंबई : मुंबईत पाऊस गायब असला तरी साथीच्या आजारांचे प्रमाण मात्र वाढत आहे. त्यात वातावरणातील बदलाचा परिणामही मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर होत असल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईत गॅस्ट्रोचे १ हजार २४४ रुग्ण आढळले आहेत. तर कुर्ला परिसरात कावीळची साथ पसरली असून गेल्या पाच महिन्यांत ३६७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
स्वाइन फ्लूच्या जोडीला संसर्गजन्य तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर पसरल्याने मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यूबरोबरच दूषित पाण्यामुळे होणारे कॉलरा, टायफॉईड, कावीळ हे आजार बळावतात. उंदीर, घूस किंवा जनावरांचे मलमूत्र साठून लेप्टोस्पायरोसीस होतो. पाऊस आणि आर्द्रता यामुळे व्हायरल, जिवाणू आणि बुरशीजन्य संक्रमणे सक्रिय होतात. डेंग्यू, मलेरिया, डोळ्यांचा दाह व अन्य प्रकारच्या संक्रमणांमध्ये वाढ होते. दमट हवामानाने शरीरात पाणी कमी होण्याची समस्यादेखील उत्पन्न होते. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून, प्रत्येक विभागाला त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विभागात स्वच्छता मोहीम राबविणे, डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणारे पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे, जंतुनाशकाची फवारणीअशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली
>असा करा स्वत:चा बचाव
वारंवार हात धुणे : जेवण करण्यापूर्वीच नव्हेतर घरी किंवा कार्यालयात कोणत्याही सार्वजनिक वस्तूला स्पर्श केल्यानंतर प्रत्येक वेळी आपण आपले हात पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी हात धुणे हे अतिशय उपयुक्त असू शकते.
लसीकरण करा : स्वाइन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. पाच वर्षांखालील बालके, गर्भवती महिला, ५०पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना विशेषत: लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात येतो.
प्रतिकारशक्ती वाढवा : व्हिटॅमिन ‘सी’ असलेली लिंबूवर्गीय फळे व समृद्ध अन्न रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी साहाय्यक ठरते.
लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवा : ताप येणे, घसा खवखवणे, चक्कर येणे, त्वचेला खाज येणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, लाल डोळे, थकवा, खोकणं, शिंका येणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. व्हायरस मोठ्या प्रमाणात होण्याअगोदर वैद्यकीय सल्ला घ्या.