मुंबईत गॅस्ट्रोचा कहर, पाणी उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:30 AM2018-07-17T05:30:21+5:302018-07-17T05:31:21+5:30
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत लेप्टोने एकूण पाच बळी घेतले असून, त्या खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत लेप्टोने एकूण पाच बळी घेतले असून, त्या खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या साथीच्या आजारांच्या अहवालानुसार, जुलैच्या पंधरवड्यात गॅस्ट्रोचे तब्बल ५१९ रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यातही गॅस्ट्रोचे ७७९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबईकरांनी अधिक काळजी घेऊन त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे.
याशिवाय, पालिकेच्या साथीच्या आजारांच्या अहवालात डेंग्यूचे १६ रुग्ण, लेप्टोचे मलेरियाचे रुग्ण १९२, हेपेटायटिसचे ४९ रुग्ण आणि कॉलराचे २ रुग्ण आढळले आहेत, तसेच या १५ दिवसांत डेंग्यूसदृश आजाराचे ३६९ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कॉलराचे दोन रुग्ण हे ‘बी’ विभागात डोंगरी आणि ‘ई’ विभाग म्हणजेच भायखळा परिसरात आढळून आले आहेत.
लेप्टोच्या बळीनंतर वरळीच्या परिसरात ५७४ घरांमधील १ हजार ९२६ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात २ डायरिया, २ तापाचे आणि २ यूआरटीआयचे रुग्ण आढळले. त्यांना नजीकच्या दवाखान्यांत उपचार घेण्यास सुचविले आहे. या वेळी २४८ घरांची तपासणी घेऊन १७ उंदरांची बिळे नष्ट करण्यात आली.
याविषयी, फिजिशिअल डॉ. कौशिक शहा यांनी सांगितले की, पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात वेगाने बदल होतो आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर बेतला आहे. अशा वेळी सर्वात आधी कोणतीही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला त्वरित घ्यावा. शिवाय, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, वैयक्तिक स्वच्छता पाळावी, पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
अशा परिस्थितीत लहानग्यांना संसर्ग होण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याकडेही अधिक सर्तकतेने लक्ष द्यावे.
>उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
>आजार जुलै २०१७ जुलै २०१८ (१ते१५)
रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
डेंग्यू ७० ० १६ ०
लेप्टो ५९ ३ १९ १
मलेरिया ७५२ २ १९२ ०
गॅस्ट्रो १०१० ० ५१९ ०
हेपेटायटिस १३४ १ ४९ ०
कॉलरा १ ० २ ०