मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेट परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गेट आॅनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सीस्टम या पोर्टलवरून गेट परीक्षेसाठी नोंदणी करताना, आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्र्थ्यांना नियमित शुल्कासह ३० सप्टेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह ७ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार होती. आता दिलेल्या मुदतवाढीनुसार, त्यांना नियमित शुल्कासह ७ आॅक्टोबर तर विलंब शुल्कासह ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान नोंदणी करता येईल.
गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३, १४ फेब्रुवारी, २०२१ या तारखांना सकाळ, दुपार अशा २ सत्रांत होईल. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, या तारखांत बदल होऊ शकतो, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी देशपातळीवर होणाऱ्या गेट परीक्षांचे नियोजन यंदा आयआयटी मुंबई करीत आहे. पूर्वी ही परीक्षा देण्यासाठी बारावीनंतर चार किंवा तीन वर्षांचे पदवी शिक्षण पूर्ण करणे गरजेचे होते. आता अखेरच्या वर्षाच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनाही संधी मिळेल.