‘गेट वे’च्या साक्षीने रंगला भव्य आंबेडकरी जलसा
By admin | Published: February 19, 2016 02:42 AM2016-02-19T02:42:37+5:302016-02-19T02:42:37+5:30
आंबेडकरी विचारांची ताकद अत्यंत समर्थपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात जलशांची अत्यंत मोलाची भूमिका आहे. गुरुवारी संध्याकाळी गेट वे आॅफ इंडियासमोर असाच शानदार आंबेडकरी जलसा रंगला.
मुंबई : आंबेडकरी विचारांची ताकद अत्यंत समर्थपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात जलशांची अत्यंत मोलाची भूमिका आहे. गुरुवारी संध्याकाळी गेट वे आॅफ इंडियासमोर असाच शानदार आंबेडकरी जलसा रंगला. हजारो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीने या जलशाला चारचाँद लावले. गण, बतावणीच्या सादरीकरणाला उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य महासंचालनालयाच्या वतीने गेट वे आॅफ इंडियावर आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या आंबेडकरी जलसाच्या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार भाई गिरकर, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी जे योगदान दिले आहे, ते योगदान सेवेच्या स्वरूपात देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन महासागराच्या साक्षीने गेट वे आॅफ इंडिया येथे करण्यात आले, असे उद्गार तावडे यांनी काढले. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी व रसिक वर्ग उपस्थित होता.
आंबेडकरी जलसामध्ये डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गण आणि बतावणी असा कार्यक्रम सादर केला; तर नंदेश उमप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा आणि धनगरगीत सादर केले. अभिजित कोसंबी यांनी भीमवाणी सादर केली. या कार्यक्रमामध्ये संविधानगीत, वादळवारा, डिमडी भजन, युगपुरुषांची गाणी, कबीर वाणी आदी डॉ. आंबेडकरांवरील कार्यक्रम सादर करण्यात आले. कृणाल वडाळे, अजय देहाडे, नागसेन सावदेकर, खंडूजी गायकवाड आदी मान्यवरांनी कार्यक्रम सादर केले.