भारतीय प्रवाशांना दुबईचे द्वार उद्यापासून होणार खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:58+5:302021-06-22T04:05:58+5:30
मुंबई : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्यापासून (२३ जून) भारतीय प्रवाशांना दुबईचे द्वार खुले होणार आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस ...
मुंबई : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्यापासून (२३ जून) भारतीय प्रवाशांना दुबईचे द्वार खुले होणार आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या भारतीयांना प्रवेश देण्याचा निर्णय दुबईच्या सर्वोच्च समितीने घेतला आहे.
दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे एप्रिल महिन्यात भारतात कोरोनाउद्रेक सुरू झाला. रुग्णसंख्येचा आलेख दररोज नवे उच्चांक गाठू लागल्याने धास्तावलेल्या देशांनी भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू केले. संयुक्त अरब अमिरातीने तर २३ एप्रिलपासून पुढील आदेशांपर्यंत प्रवेश देण्यास मनाई केली. त्यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात अनेकांचे दुबईवारीचे स्वप्न भंगले. तब्बल तीन महिन्यांनंतर यूएई प्रशासनाने निर्बंधात शिथिलता दिल्याने भारतीय प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारतीयांना दुबईची दारे उघडी होणार असली तरी नियमांचे अडथळे कमी झालेले नाहीत. दुबईच्या सर्वोच्च समितीने जारी केलेल्या नियमावलीनुसार, संयुक्त अरब अमिरातीने मान्यता दिलेल्या लसींचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तसेच संबंधित ‘लसवंत’ प्रवाशांनी कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. त्याची वैधता केवळ ४८ तास असेल. अहवालावर क्यूआर कोड असणे अनिवार्य आहे. दुबईत पोहोचल्यानंतर संबंधित प्रवाशांची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रत्येक प्रवाशाने संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक, विशेष मोहिमेवर आलेले सरकारी कर्मचारी, यूएईचे गोल्डन आणि सिल्व्हर व्हिसाधाकर यांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण न झालेल्या भारतीयांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय ७ जुलैनंतरच घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
...तर सावधान
बरेच भारतीय प्रवासी अन्य देशांत थांबा घेऊन दुबईत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यूएई प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लस न घेतलेल्या प्रवाशाच्या पासपोर्टवर मागील १५ दिवसांत भारतात प्रवास केल्याचा उल्लेख असल्यास त्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी याची खबरदारी घेऊनच तिकीट आरक्षित करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
सर्वाधिक प्रवासी मुंबईकर
दुबईला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांत मुंबईकरांची संख्या सर्वाधिक आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत मुंबई विमानतळावरून तब्बल १ लाख ६० हजार १६९ प्रवाशांनी दुबईवारी केली.