Join us

जिजामाता उद्यानात उभारणार गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 2:01 AM

म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्रेन, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्र प्रतीक असणारा कॅमेरा अशी सर्व प्रेक्षणीय स्थळे भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अवतरणार आहेत.

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्रेन, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्र प्रतीक असणारा कॅमेरा अशी सर्व प्रेक्षणीय स्थळे भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अवतरणार आहेत. उद्यान प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षणीय स्थळे, वास्तू यांच्या प्रतिकृती पाना-फुलांच्या रूपात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राणीच्या बागेत बहरणार आहेत.दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ भरविण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ‘मुंबईची ओळख असणाऱ्या मानबिंदूंच्या प्रतिकृती’ अशी या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या अंतर्गत पाना-फुलांपासून तयार केलेल्या विविध मानबिंदूंच्या प्रतिकृती प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. मुंबई परिसरात अत्यंत दुर्मीळ असणाºया कृष्णवडासारख्या अनेक दुर्मीळ देशी प्रजातींची झाडेदेखील येथे बघता येणार आहेत. राणीच्या बागेत आयोजित या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी होणार आहे.गेल्या वर्षी २०१९ मध्ये ‘संगीत आणि वाद्य’ या मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित उद्यान प्रदर्शनात पाना-फुलांपासून तयार केलेली सनई, बासरी, गिटार, तबला, वीणा, सितार, संवादिनी (हार्मोनियम) इत्यादी वाद्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या.२०१६ मध्ये सुमारे ५० हजार मुंबईकरांनी वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट दिली होती. २०१७ मध्ये ७५ हजार तर २०१८ व वर्ष २०१९ मध्ये तब्बल दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ८ पर्यंत, तर १ आणि २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ यादरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.