Join us

गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, ट्राम, गिरणी आणि कॅमेरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:17 AM

यंदाच्या २५ व्या वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे औचित्य लक्षात घेऊन प्रदर्शनात एकंदरीत २५ हजार रोपटी असणार आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित करण्यात येणारे ३ दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन यंदा आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान केले जाणार आहे.

यंदाच्या २५ व्या वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे औचित्य लक्षात घेऊन प्रदर्शनात एकंदरीत २५ हजार रोपटी असणार आहेत. त्याचबरोबर गेटवे आॅफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्रनगरीचे प्रतीक असणारा कॅमेरा अशा मुंबईची ओळख असलेल्या विविध मानबिंदूंच्या प्रतिकृती व सेल्फी पॉइंट असणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याचे कामगार, कर्मचारी, अधिकारी यासाठी अक्षरश: दिवसरात्र काम करीत आहेत. या रौप्य महोत्सवी प्रदर्शनाला अधिकाधिक मुंबईकरांनी भेट द्यावी, असे आवाहन यानिमित्ताने महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी सकाळी होईल. प्रदर्शनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ३५ गटांमध्ये उद्यानविषयक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जास्तीतजास्त झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे, उद्यानांची देखभाल, वाहतूक बेट व दुभाजकांचे परिरक्षण, सोसायटी स्तरावरील रुफ टॉप/टेरेस उद्यान, उद्यान कचऱ्यापासून खतनिर्मिती यांसारख्या विविध गटांचा समावेश आहे.

प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरश: शेकडो प्रकार मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत. मुंबई परिसरात अत्यंत दुर्मीळ असणाºया कृष्णवडासारख्या अनेक दुर्मीळ देशी प्रजातींची झाडे बघता येणार आहेत. परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :मुंबई