Join us

गेटवे, मरिन ड्राइव्ह, जुहू बीच अन् रेस्टॉरंटही फुल्ल... वेलकम २०२५!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:40 IST

मुंबईतील गरीब वस्त्यांपासून ते  उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळीकडेच मंगळवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जल्लोषात सुरू होती. आपापल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये विविध पदार्थांचा, शीतपेयांचा अनेकांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

मुंबई : आठवडाभरापासून सुरू असलेल्या थर्टीफर्स्टच्या प्लॅनिंगला मंगळवारी अखेर मुंबईकरांनी मूर्तस्वरूप दिले. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची सायंकाळ आणि किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या लाटांसोबत उधाणलेला तरुणाईचा सागर, असे चित्र मरिन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी यासारख्या समुद्र किनाऱ्यांवर पाहायला मिळाले. त्याचबरोबर निवासी सोसायट्यांचे आवार, गच्ची तसेच मॉल्स, छोटे-मोठे रेस्टॉरंट आबालवृद्धांच्या आनंदोत्सवात गजबजून गेले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या जल्लोषात त्यांनी नववर्षाचे स्वागत केले. 

मुंबईतील गरीब वस्त्यांपासून ते  उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळीकडेच मंगळवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जल्लोषात सुरू होती. आपापल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये विविध पदार्थांचा, शीतपेयांचा अनेकांनी मनसोक्त आस्वाद घेतला. काही ठिकाणी पदार्थांचे दर वाढविण्यात आले होते, तर काही रेस्टॉरंटने समूहाने आलेल्या ग्राहकांना १० टक्के सवलतीही ऑफर केल्या होत्या. हॉटेलसमोर रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळाली.

खेळ, मनोरंजनाचा लुटला आनंदअनेक सोसायट्यांमध्ये सायंकाळनंतर आयोजित केलेले विविध खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम यात सोसायटीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभागी होत त्याचा आनंद लुटला. त्यानंतर डीजेच्या तालावर तरुण-तरुणी थिरकल्याचे पाहायला मिळाले. तर, चिमुकल्यांनी आपल्या सोसायटीच्या आवारात जुन्या कटू आठवणींच्या ‘ओल्ड मॅन’चे दहन करत नव्या वर्षाचे स्वागत केले.

तरुणाई डिस्कोवर थिरकली- लोअर परळ, वरळी परिसरात असणाऱ्या अनेक पब आणि डिस्को थेकमध्ये दुपारपासूनच तरुणाईने आकर्षक कपड्यांमध्ये प्रवेश घ्यायला सुरुवात केली होती.- अंधेरी, जुहू या परिसरातही हेच चित्र पाहायला मिळत होते. पहाटेपर्यंत तरुणाई नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डिस्कोवर थिरकत होती.

पारंपरिक स्वागत- माहीम आणि वांद्रे माउंट मेरी येथील चर्चमध्ये रात्री पारंपरिक पद्धतीने उपासनेद्वारे नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.- यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव आणि अन्य समाजातील नागरिकही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 

टॅग्स :नववर्ष