पक्षांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव

By admin | Published: January 31, 2017 02:48 AM2017-01-31T02:48:56+5:302017-01-31T02:48:56+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हेवेदावे समोर येत असतानाच राजकीय क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासह ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या

Gathering of party workers | पक्षांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव

पक्षांकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हेवेदावे समोर येत असतानाच राजकीय क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासह ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या जमवाजमवीला वेग आला आहे. विशेषत: सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असून, जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येईल; तसतशी यातील रंगत आणखी वाढणार आहे.
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाहू लागलेल्या निवडणुकीच्या वाऱ्याने आता वेग पकडला आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आणि एमआयएम या राजकीय पक्षांमध्ये जंगी लढत आहे. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कार्यकर्त्यांची कमतरता नसली तरीदेखील युती आणि आघाडीत झालेल्या काडीमोडामुळे साहजिकच कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. याच विभागलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरात दिवसा राजकीय पक्षांच्या कार्यालयात तुरळक गर्दी असली तरी सायंकाळसह रात्री ही कार्यालये कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत आहेत. पूर्व उपनगरात कुर्ला येथे काँग्रेससह मनसेच्या कार्यालयातील सायंकाळसह रात्रीची गर्दी वाढत असून, साकीनाक्यास काजुपाड्यातील कार्यालयात, पश्चिम उपनगरात अंधेरीसह जोगेश्वरी, दहिसर येथेही कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र पाहण्यास मिळत असून, संभाव्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या घरगुती गाठीभेटीचे प्रमाण वाढले आहे.
विशेषत: महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासह कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून महिला कार्यकर्त्या जोडण्यासह तरुण कार्यकर्त्यांची साखळी वाढविण्यावर भर दिला जात आहे. मकरसंक्रांतीनंतर हे प्रमाण वाढले असून, सायंकाळसह रात्री पक्षीय कार्यालयात वाढणारी गर्दी साखळी स्वरूपात आणण्यासाठी गाठीभेटी वाढल्या आहेत. पक्षीय स्तरावर स्थानिक कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या उत्साहाचे स्वरूप वाढविण्यासाठी स्थानिक बैठकांचे सत्र वाढले आहे.
राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अद्याप वेग आला नसला तरी १ फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया वेग पकडणार आहे. अशावेळी शक्तिप्रदर्शनासह कार्यकर्त्यांचा फौजफाटा वाढविण्यासाठी राजकीय पक्षांमधील अंतर्गत कलहच उफाळून येत आहेत. विधानसभा स्तरावरील पदाधिकारी आणि वॉर्ड, प्रभाग स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये फौजफाटा वाढविण्यासाठी सुसंवादावर भर दिला जात असून, जनरेशन गॅप निर्माण होणार नाही; याची काळजी विधानसभा स्तरावरील पदाधिकारीच घेत असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे. (प्रतिनिधी)

कार्यकर्ते ‘आमने-सामने’
अनेक राजकीय पक्षांची स्थानिक कार्यालये शेजारी शेजारी आहेत. कुर्ला येथील वाडीया इस्टेटमध्ये काँग्रेस आणि मनसेचे कार्यालय एकमेकांशेजारी आहे. सायंकाळसह रात्री येथे पक्षीय कार्यकर्त्यांची झुंबड उडत असून, विरोधक म्हणून कार्यरत असले तरी येथे ‘आमने-सामने’ आलेल्या कार्यकर्त्यांच्या नकळतच गळाभेटी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत: दोन्ही कार्यालये लगत असल्याने येथे उपस्थित कार्यकर्ता नक्की कोणत्या पक्षाचा? याबाबत नवख्या व्यक्तीचा संभ्रम होत आहे.

एकाच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही गटबाजी आहे. मात्र वरिष्ठांचा वचक असल्याने ही गटबाजी उफळून येत नसल्याचे चित्र आहे.

पण अंतर्गत वादामुळे स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांची धुसफूस वाढली असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेले राजकारण आणखीच उफाळून येण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे.

Web Title: Gathering of party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.