मुंबई : गणेशाच्या आगमनानंतर मुंबईकरांना आता गौराईच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. गौरीचे दागिने, मुखवटे, फुलांनी, वेण्यांनी बुधवारी बाजार सजला होता. ‘गणेश-गौरी भक्त’ या खरेदीत मग्न झाल्याचे चित्र दादर, परेल, भुलेश्वर, घाटकोपर, बोरीवलीमधील बाजारांमध्ये दिसून आले. घरांमध्ये मुखवट्याच्या आणि खड्याच्या अशा दोन प्रकारे गौरी आणल्या जातात. मातीच्या, प्लॅस्टर आॅफ पॅरिस आणि कागदाच्या मुखवट्यांनी भक्तांचे लक्ष वेधले होते. मुखवट्याच्या गौरींसाठी दागिने व साड्यांच्या खरेदीसाठी विविध प्रकार बाजारात उपलब्ध होते. टिकली, नथ, बांगड्या, हार, बांगड्या, पैंजण अशा विविध गौरीच्या आभूषणांनी बाजार सजला होता. गौरीच्या मुखवट्याच्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी झाली होती. गौरीपूजनाबरोबरच नैवेद्यासाठी खास पुरणपौळी, गोड पदार्थांचा बेत आखला जातो. त्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पुरणपोळीच्या आॅर्डर मुंबईकरांनी आधीपासून देऊन ठेवल्या होत्या. गावाकडे खड्यांच्या गौरी या नदी काठी अथवा विहिरीजवळून आणल्या जातात, पण शहरात नदी अथवा विहीर जवळ नसल्याने, तुळशीजवळ खडे आणून ठेवण्याची पद्धत आहे. घरातील मुलगी गौरी घेऊन घरात येते. अनेक ठिकाणी गौरीचे वाजतगाजत स्वागत केले जाते. दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भक्तगणांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे. नामांकित गणेशोत्सव मंडाळांबाहेर भक्तगणांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात आता घरोघरी गौरींच्या आगमनामुळे उत्साह शिगेला पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)
गौराई माझी लाडाची गं!
By admin | Published: September 08, 2016 3:57 AM