गौरवीने पोहून पार केले जुहू ते गेटवे अंतर; ४६ किलोमीटर पोहण्याचा विक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:48 AM2018-02-07T02:48:53+5:302018-02-07T02:49:50+5:30
मुंबई : उदयपूरस्थित १४ वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे ४६ किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे ३.३0 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी १.३२ वाजता पोहोचली. हे ४६ किलोमीटरचे अंतर १0 तासांत यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उदयपूरस्थित १४ वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे ४६ किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे ३.३0 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी १.३२ वाजता पोहोचली. हे ४६ किलोमीटरचे अंतर १0 तासांत यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला. जुहू ते गेटवे हे अंतर आजवर कोणत्याही जलतरणपटूने पोहून पार केलेले नाही. गेटवे ऑफ इंडियाला गौरवीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन दिले.
यावेळी गेटवे ऑफ इंडियाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित राहून तिचे स्वागत केले. तर, या विक्रमात आई-वडील, आजी, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे गौरवीने सांगितले.
अभिमान वाटतो - पर्यटनमंत्री जयकुमार रावल
या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, देशातील खुल्या समुद्रातील सर्वांत जास्त अंतर गौरवीने पार केले आहे. हा जागतिक विक्रम म्हणायला हरकत नाही. तिने हा विक्रम १0 तासांत केला आहे.
राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांतर्फे तिच्या अभिनंदनासाठी आलो होतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या देशातल्या शालेय मुलीने विक्रम प्रस्थापित केल्याचा अभिमान असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
स्वप्न झाले साकार : जुहू बीच ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार करण्याचे गौरवीचे स्वप्न होते. ते स्वप्न आता साकार झाले आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- शुभ सिंघवी, गौरवीची आई