मुंबई : पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. सोमवारी शहर-उपनगरातील चौपाट्या, कृत्रिम तलावांत सकाळपासून गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत, सोमवारी पाच दिवसांच्या बाप्पांसोबत गौरार्इंचे विसर्जन करण्यात येणार आहे. २०१७ सालचा विचार करता, पाचव्या दिवशी ६७७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते, तर घरगुती गणेशमूर्तींची संख्या १५ हजार ७५९ एवढी होती. एकूण १६ हजार ४३६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. या वर्षीही हा आकडा ६० हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.अखेर शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आग्रहाचे निमंत्रण देऊन, साश्रू नयनांनी निरोप देण्यात येईल. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी गौराईची पूजा केल्यानंतर, बाजरीची भाकरी, गोडधोड पदार्थाचा नैवेद्य असलेली शिदोरी बांधून या शिदोरीचे गौराईसोबत विसर्जन करण्यात येईल.लालबाग-परळकडे विसर्जनानंतर कूचपाच दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर मुंबईकर भक्तगण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाच्या दर्शनासाठी कूच करताना दिसून येतील. चौपाट्यांवरील गर्दी लालबाग, परळ आणि खेतवाडीच्या परिसरातील सार्वजनिक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावताना दिसतील.लालबागचा राजा, गणेशगल्लीचा बाप्पा, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळ यासह नरेपार्कच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून गर्दी करतात. याशिवाय, खेतवाडीच्या ११ गल्ल्यांतील उंच व वैविध्यपूर्ण आकारातील गणेशमूर्ती हेदेखील भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू असते.बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्जदीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर आता सोमवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे मुंबई शहर आणि उपनगरात विसर्जन करण्यात येईल. त्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याता आल्या आहेत. यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून मुंबईतील चौपाट्या आणि विसर्जन स्थळांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाहणीही केली आहे.विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, स्वागत कक्ष आदींची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे आदी ठिकाणच्या चौपाट्यांवर, तसेच गोराई जेट्टी, पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड, पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव, तसेच सायन तलाव इत्यादी ठिकाणी पालिकेने विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे येतात. त्यांच्याकरिता मंडपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.हलक्या सरींची शक्यतावीकेन्डला हजेरी लावलेल्या वरुणराजाने बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेल्या भक्तगणांची तारांबळ उडविली. आता सोमवारीही हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पा-गौराईला निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी वरुण राजा विर्सजन मिरवणुकांमध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता गणेश भक्तांमध्ये आहे.
गौरी-गणपतींचे आज विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 5:16 AM