मुंबई : उदयपूरस्थित गौरी सिंघवी या १४ वर्षांच्या मुलीने ४६ किलोमीटर अरबी समुद्र पोहून पार करण्याचा निश्चय केला आहे. ६ फेब्रुवारी रोजी जुहू बीच येथून पहाटे ३.३० वाजता ती पोहायला सुरुवात करणार आहे. गेटवे आॅफ इंडियाला दुपारी १२च्या सुमारास ती पोहोचेल. जुहू बीच ते गेटवे आॅफ इंडिया अंतर पोहून जाणारी ती पहिलीच जलतरणपटू ठरणार आहे. तिच्या आश्यर्यजनक कामगिरीसाठी मुंबईकर गेटवे आॅफ इंडिया जवळ उपस्थित राहून तिला प्रोत्साहन देणार आहेत.गौरीने या आधी वरळी सीलिंक ते गेटवे आॅफ इंडिया हे ३६ किमी अंतर अवघ्या ६ तास ३५ मिनिटांत पार केले आहे. तर गव्हर्नर हाउसपासून ते गेटवे आॅफ इंडियापर्यंतचे हे अंतरही तिने ३ तास ५८ मिनिटांत पोहून पार केले आहे. गौरीने आतापर्यंत राज्यस्तरावर १४ सुवर्ण पदक, ८ रौप्य पदक आणि ४ कांस्य पदके पटकावली आहेत, तसेच जिल्हा स्तरावर १९ सुवर्ण पदक, १० रौप्य पदक पटकावले आहे. राजस्थान येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत १ हजार ५०० मीटर पोहून विक्रम नोंदविला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, राजस्थानचे गृहमंत्री गुलाब कटारीया यांच्या हस्ते गौरीला गौरविण्यात आले आहे. राजस्थान मंच, जयपूर आणि महाराणा मेवाड चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीनेही तिचा सन्मान करण्यात आला आहे.
गौरी सिंघवी पुन्हा विक्रम नोंदविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:17 AM