Join us

एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:59 PM

अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुईस फायनान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

मुंबई - सध्या शिवसेना पक्ष मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. त्यातच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करुन विरोधी शिवसेना गट तयार केला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे राजकीय संकटांना तोंड देत आहेत. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासंदर्भात कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, उद्योग व्यवसायात चढता आलेख निर्माण करुन जगात ओळख निर्माण केलेल्या गौतम अदानी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे. नेता आणि उद्योगपतींमधील ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होती, याबाबत माहिती मिळू शकली नाही. 

अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुईस फायनान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांची संपत्ती US$ 154.7 अब्ज इतकी झाली आहे. त्यामुळे, गौतम अदानी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यासोबतच, गुजरातचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबध आहेत. म्हणूनच, गौतम अदानी सध्या राजकीय आणि उद्योग जगतात लक्षवेधी आहेत. त्यातच, अदानी यांनी बुधवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानेही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना आणि वेंदात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असता, दरम्यान ही भेट झाली आहे.  

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्याशी तब्बल १ तास चर्चा केल्याची माहिती आहे. या भेटीनंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटप्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी, भाजप, मोदी-शहा आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

अदानी समूहाची व्याप्ती

गौतम अदानी यांनी मेहनतीच्या जोरावर हे स्थापन पटकावले आहे. आज अदानी समुह पायाभूत सुविधा, खाणकाम, उर्जा आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग सार्वजनिक भागीदारीतून येतो. अदानी इंटरप्राइजेज, अदानी पॉवर आणि अदानी ट्रांसमिशनमध्ये 75 टक्के वाटा आहे. तर, टोटल गैसचा सूमारे 37 टक्के, अदानी पोर्ट्सचा 65 टक्के आणि ग्रीन एनर्जीचा 61 टक्के वाटा गौतम अदानी यांच्याकडे आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेअदानीउद्धव ठाकरेशिवसेना