Join us

गौतम नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 4:46 AM

माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना शुक्रवारी दिले.

मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना शुक्रवारी दिले. त्याचबरोबर झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी यांनाही ३१ आॅक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने गौतम नवलखा व प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी १ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली. गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला. तर तेलतुंबडे यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.दरम्यान, झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी (७०) यांनीही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेलतुंबडे यांच्याप्रमाणे स्वामी यांच्याही घराची आणि कार्यालयाची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नाही. न्यायालयाने त्यांनाही ३१ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला.या प्रकरणातील आरोपी अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या दोघांनीही तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे दाखल करण्याचे निर्देश देत अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला. या दोघांचीही नजरकैद शुक्रवारी संपली आहे.