Join us

आयटीचे प्रधान सचिव गौतम सक्तीच्या रजेवर! कर्जमाफी, शिष्यवृत्तीचा घोळ भोवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:35 PM

कर्जमाफी, शिष्यवृत्तीसारख्या विषयांत घातलेला घोळ, अनेक विभागांशी झालेले वाद या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांना सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : कर्जमाफी, शिष्यवृत्तीसारख्या विषयांत घातलेला घोळ, अनेक विभागांशी झालेले वाद या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांना सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.कर्जमाफीचा अचूक डेटा सहकार विभागास वेळेत देण्यात आयटी विभागाला अपयश आले. कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला आयटीच्या अधिका-यांनी पाठ दाखविली. आयटी विभागाकडून उत्पादन शुल्क, वित्त, सामाजिक न्याय, सामान्य प्रशासन, गृह विभागातही सहकार्य केले जात नसल्याची चर्चा होती. यावरून गौतम हे गेले काही दिवस सर्व महत्त्वाच्या विभागांकडून टीकेचे लक्ष्य बनले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरअखेर ७५ टक्के शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर करूनही आतापर्यंत केवळ चार हजार शेतक-यांनाच कर्जमाफी देण्यात आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात मांडले होते. आयटी विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतक-यांना बसला, असे या वृत्तात म्हटले होते.- राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना सात महिन्यांपासून एक छदामही शिष्यवृत्ती मिळालेली नाही आणि त्यासाठी आयटी विभाग मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सातत्याने दिले होते.- धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे आयटी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.- व्ही. के. गौतम यांनी वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज दिला, अशी माहिती आहे. मात्र आजारी असलेल्या वडिलांच्या भेटीसाठी गावी जात असल्याचे गौतम यांचे म्हणणे आहे. गौतम यांच्या कार्यकाळात आॅनलाइन कर्जमाफी व इतर कामांसाठी आयटी विभागाकडून देण्यात आलेल्या कंत्राटांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र