गौतम सिंघानिया यांना दिलासा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:51 AM2018-12-14T05:51:08+5:302018-12-14T05:51:51+5:30
रेमण्ड समुहाचे माजी अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या ‘द इन्कप्लिट मॅन’ या आत्मचरित्र प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, यासाठी रेमण्ड लि.ने ठाणे दिवाणी न्यायालयात दावा केला.
मुंबई: रेमण्ड समुहाचे माजी अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या ‘द इन्कप्लिट मॅन’ या आत्मचरित्र प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, यासाठी रेमण्ड लि.ने ठाणे दिवाणी न्यायालयात दावा केला. तो मुंबईच्या न्यायालयात वर्ग करावा, तोपर्यंत दाव्यावरील सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी गौतम सिंघानिया यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. मात्र, गुरुवारी न्यायालयाने सिंघानिया यांची मागणी मान्य करण्यास नकार देत दाव्यावरील सुनावणीचा मार्ग मोकळा केला आहे.
‘द इन्कप्लिट मॅन’ मधील मजकूर वादग्रस्त, कंपनीची बदमानी करणारा असल्याचा आरोप करत रेमण्ड कंपनीने ठाणे दिवाणी न्यायालयात सिंघानिया यांच्या आत्मचरित्राविरोधात दावा दाखल केला. त्यावरील सुनावणी प्रलंबित असताना सिंघानिया यांनी ठाणे न्यायालयात जाणे गैरसोयीचे असल्याने मुंबईतील न्यायालयात दावा वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यावरील सुनावणी न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. न्या. प्रभुदेसाई यांनी सिंघानिया यांची मागणी अमान्य केली. तसेच याचिकेवर कंपनीला उत्तर देण्याचे निर्देश दिले. कंपनीने दाखल केलेल्या दाव्यावर ठाणे न्यायालयात १७ डिसेंबरला सुनावणी होईल.