मुंबई - सबके कातिल, गौतमी पाटील म्हणून फेमस झालेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम दिवाळी पहाटनिमित्त घेण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सकाळीच लावणीच्या तालावर गौतमी थिरकली, गौतमीसोबत ठाण्यातील तरुणाईही थिरल्याचं दिसून आलं. मात्र, दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमीचा डान्स झाल्यामुळे आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. तसेच, दिवाळी पहाटेचं हे नृत्य वंदनीय बाळासाहेबांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपक्षेत नसेल असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने भन्नट नृत्य सादर करत, चाहत्यांनी मने जिंकली. ठाण्यातील चिंतामणी चौकात या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळी पहाट हा भक्तीमय आणि भजन गीत कार्यक्रमांनी साजरी होत असते. मात्र, दिवाळीच्या सुरेल, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाऐवजी थेट डीजेच्या तालावर लावणी नृत्याचा कार्यक्रम झाल्याने सोशल मीडियावरूनही टीका होत आहे. दरम्यान, यापूर्वी गौतमीने मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमातही डान्स सादर केला होता. त्यावेळी, आपण प्रथमच मुंबईत आलो आहोत, असे तिने म्हटले होते. आता, ठाण्यातील कार्यक्रमानंतरही तिने प्रथमच मी ठाण्यात कार्यक्रम केल्याचं सांगितलं. दरम्यान, गौतमीच्या ठाण्यातील या कार्यक्रमावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.
गौतमीचा चित्रपट लवकरच भेटीला
गौतमीची लोकप्रियता कायम असून उत्सावनिमित्त आयोजित कार्यक्रमांना तिला प्रधान्य दिलं जात असल्याचं दिसून येतंय. आता तर तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केल्याने तिची क्रेझ अधिकच वाढली आहे. गौतमी पाटील लवकरच 'घुंगरू एक संघर्ष' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. गौतमीचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे तिच्यासह चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.