मुंबई - लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या बार्शी येथील तिच्या कार्यक्रमावरुन वाद झाला होता. त्यानंतरही, तिच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम असून नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली तसेच दोन छायाचित्रकारांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रकार घडला. यावरुन, गौतमी दररोज माध्यमांत चर्तेत आहे. त्यातच, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यानेही गौतमीला इशारा दिला होता. आता, गौतमीने छोट्या पुढाऱ्याला मोठं उत्तर दिलंय.
महाराष्ट्राचा बिहार करू नका, अशा शब्दात धनश्यामने गौतमी पाटीलवर टीका केली होती. सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. लावणी वगळता इतर अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत छोटा पुढारी घनश्या यांनी गौतमी पाटीलला इशारा दिला. तसेच, आपला आणि गौतमीचा कोणताही वाद नसला तरी लावणी बदनाम होऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. गौतमी ताईंना महाराष्ट्रावर कायम क्रेझ टिकून ठेवायची असेल तर चांगला कार्यक्रम आणि चांगला डान्स करावा लागेल, असं चिमटाही छोट्या पुढाऱ्याने काढला होता. आता गौतमीने घनश्यामला उत्तर दिलंय.
सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. 'मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?', असा सवाल गौतमी पाटीलने घनश्याम दरोडे यांस केला.
दरम्यान, पत्रकारांना धक्काबुक्की मारहाण होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही गौतमीने केले.