मुंबईतील आमदाराच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलचा जलवा'; चाहत्यांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:41 PM2023-09-07T21:41:35+5:302023-09-07T21:42:48+5:30
लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलला मुंबईतील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते.
मुंबई - राज्यभरात दहीहंडीचा उत्साह असून गल्लीपासून मुंबईपर्यंत मोठ-मोठे मनोरे रचत दहीहंडी फोडल्या जात आहेत. पुणे, ठाणे आणि मुंबईतील दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. येथील दहीहंडी उत्सवाला लाखोंचे बक्षीसही ठेवले जाते. तर, सेलिब्रिटींचीही वर्दळ पाहायला मिळते. राजकीय नेते, अभिनेते, आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मुंबईच्या दहीहंडी उत्सवातून राज्यभर पाहायला मिळतो. यंदाच्या मुंबईतील दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलच्या डान्सचा जलवा पाहायला मिळाला. मुंबईत आपला कार्यक्रम झाल्याचा मनस्वी आनंद असल्याचे गौतमीने म्हटले आहे.
लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलला मुंबईतील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. त्यानिमित्त गौतमी मुंबईत डान्ससाठी आली होती. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात आयोजित दहीहंडी उत्सवात गौतमीने हजेरी लावली. यावेळी, विविध गाण्यांवर डान्स केला. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने ह्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात गौतमीने हजेरी लावली.
सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर तिने परफॉर्मन्स सादर केला. गोविंदा आणि गौतमीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर, गौतमीच्या नृत्याविष्कारानेही या कार्यक्रमाचा उत्साह डबल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, पाव्हणं जेवला का? या गाण्यावरही गौतमीने जबरदस्त डान्स केला. तिच्या या डान्सला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी टाळ्या अन् शिट्ट्यांच्या माध्यमातून डान्सला पसंती दिली. यावेळी तरूणाईत उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
गौतमीने मुंबईकरांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले आहेत, तसेच हे प्रेम पाहून अधिक आनंद झाल्याचं तिने म्हटले. माझे बहुतांश कार्यक्रम पुण्यात आणि इतर जिल्ह्यात असतात. पण, आज मुंबईत दहीहंडी उत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे भारी वाटलं, असेही गौतमीने म्हटले.