Join us  

जेवणातून गुंगीचे औषध देत घरातील अडीच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

By मनीषा म्हात्रे | Published: February 19, 2024 8:47 PM

नोकर जाळ्यात, खार पोलिसांची कारवाई

मुंबई: घर मालकासह कुटुंबीयांना जेवणातून गुंगीचे औषध देत घरातील दोन कोटी ४६ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पसार झालेल्या दोन नोकरांना खार पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. निरज उर्फ राजा यादव (१९) आणि राजु उर्फ शत्रुघ्न कुमार (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याजवळून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पश्चिमेकडील परिसरात राहण्यास असलेल्या ५३ वर्षीय तक्रारदार यांच्या कुटुंबाचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे काम करत असलेल्या जुन्या चालकाच्या ओळखीतून यादव आणि कुमार याला कामावर ठेवले होते. घरातील करोडो रुपये किंमतीचे दागिने बघून या दोघांची नियत फिरली. 

दोघांनी दागिने चोरीचा प्लॅन आखून १० फेब्रुवारीच्या रात्री घर मालक कुटुंबाला आणि एका नोकर महिलेला जेवणातून गुंगीचे औषध देऊन सुमारे दोन कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या दोन बॉक्समधील हिरे जडीत दागिन्यांवर हातसाफ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. गुंगीच्या औषधाने त्रास होऊ लागल्याने कुटुंबियाना उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन रुग्णालयात उपाचार घेत असलेल्या तक्रारदार यांची फिर्याद नोंदवून घेतली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवत, खार पोलिसांनी यादव आणि कुमार यांचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपी बिहारला पसार झाल्याचे समजताच खार पोलिसांनी बिहारमध्ये जात येथील हाथौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई