शिवजयंतीच्या निमित्ताने येणार शिवकालीन नाण्यांचे गॅझेटिअर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:46 AM2024-01-25T10:46:22+5:302024-01-25T10:49:15+5:30
स्वराज्याच्या काळात चलनात असणाऱ्या नाण्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दर्शनिका विभागाकडून लवकरच या चलनांवरचे विशेष गॅझेटिअर प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई हे नाणे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, शिवकालीन अन्य चलनांविषयी सर्वसामान्य अनेकदा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वराज्याच्या काळात चलनात असणाऱ्या नाण्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दर्शनिका विभागाकडून लवकरच या चलनांवरचे विशेष गॅझेटिअर प्रकाशित करण्यात येणार आहे. येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने या गॅझेटिअरचे प्रकाशन करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.
या गॅझेटिअरच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले चलन, नाण्यांची पार्श्वभूमी, इतिहास आता उलगडणार असून, ती नाणी कोणती, ती चलनात कधी आली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायला मदत होणार आहे.
नाण्यांचा समग्र प्रवास वाचकांच्या भेटीला :
दर्शनिका विभागाच्या या गॅझेटिअरमध्ये शिवकालीन चलनांत एक शिवराई, अर्धी शिवराई आणि पाव शिवराई असे नाण्यांचे प्रकार होते. याव्यतिरिक्त स्वराज्यात सोन्याची नाणीही होती, ज्यांना ‘शिवराई होन’ असे संबोधले जाते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दक्षिण प्रांतातही काही नाणी चलनात आणली गेली.
त्यापैकी ‘कासू’, ‘फनम’, ‘होन नुखरा’ या नाण्यांचा संदर्भ या गॅझेटिअरमध्ये देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांवर विजयनगर साम्राज्याच्या नाण्यांचा प्रभाव कसा होता, नाण्यांसाठी वापरण्यात आलेले विविध धातू, त्यांचे वजन याचाही वेध घेतला आहे.
अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत ही नाणी चलनात होती. इंग्रजांनी दबाव टाकून ही नाणी बंद केली, तेव्हा शिवकालीन नाणी चलनातून बाहेर पडली, अशा इतिहासातील काही घटनांची माहिती देत स्वराज्यातील नाण्यांचा समग्र प्रवास छायाचित्रांसह वाचकांच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इंग्रजी, फारसी लेखकांनी लिहिलेली कागदपत्रे; तसेच स्वराज्यात सुरू असलेल्या चलनांचे संदर्भ, पुरावे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संशोधन करून वापरल्या जाणाऱ्या नाण्यांचा इतिहास वाचकांसमोर आणण्यात येणार आहे