Join us

आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अर्थकारणाचा गिअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:05 AM

भ्रष्टाचार हाेत असल्याची चर्चा; आराेपात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक ...

भ्रष्टाचार हाेत असल्याची चर्चा; आराेपात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी पदोन्नतीची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, या अधिकाऱ्यांनी अर्थकारणाचा ‘गिअर’ टाकल्याशिवाय ही बढती आणि बदली त्यांच्या पदरी पडत नाही, अशी चर्चा या विभागत दबक्या आवाजात सुरू आहे. येत्या काही दिवसांत २५० ते ३०० बदल्या होणार असून त्यासाठीची देवाणघेवाण पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरटीओ अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांची बदली होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतरही अनेक अधिकाऱ्यांची बदलीच केली जात नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्याचा आरोप असून वर्धा येथे कार्यरत असलेला एक अधिकारी हे बदली-बढतीचे रॅकेट चालवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काळात होणाऱ्या बदल्यांसाठीची देवाणघेवाण या अधिकाऱ्याने पूर्ण केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

बदली, बढतीसाठी अर्थपूर्ण व्यवहारांची अपेक्षा वरिष्ठांकडून केली जात असल्याचे प्रतीक्षा यादीतल्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही मागणी पूर्ण न करू शकलेल्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नती न घेताच निवृत्ती पत्करावी लागल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

* मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदलीला मुहूर्त मिळेना

नियमानुसार तीन वर्षांनी अधिकाऱ्यांची बदली होणे अपेक्षित आहे. पण मंत्रालयातील एक अधिकारी गेल्या सहा वर्षांपासून परिवहन विभागात आहे. तो अधिकारी आणि रॅकेट चालवणारा अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यामुळे त्या अधिकाऱ्यावर मेहेरबानी केली जात असल्याची चर्चा परिवहन विभागात आहे.

* हा तर परिवहन विभागातील सचिन वाझे

बदल्यांचे रॅकेट चालवणारा अधिकारी हा परिवहन विभागातील सचिन वाझे आहे. त्याला अटक करून परिवहन मंत्र्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. तसेच या सगळ्या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी व्हावी.

अतुल भातखळकर, आमदार

* बदल्या नियमानुसारच!

आरटीओतील बदल्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य नाही. नियमानुसार या बदल्या करण्यात येत आहेत. आरोप करणाऱ्यांनी तपास यंत्रणांकडे तक्रार करावी. त्यांना कोणीही रोखलेले नाही.

वरिष्ठ अधिकारी, परिवहन विभाग

.....................