राम रंगी रंगले मनोरंजन विश्व, 'गीत रामायण'सोबत 'रामायण' मालिकांनी वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:34 PM2024-04-15T19:34:02+5:302024-04-15T19:35:48+5:30
रामनवमीच्या निमित्ताने मनोरंजन विश्वही राम रंगी रंगले आहे. 'गीत रामायण'च्या प्रयोगांसोबतच रामायणावर आधारलेल्या छोट्या पडद्यावरील मालिका लक्ष वेधत आहेत.
मुंबई - अयोध्येतील रामलल्ला विराजमान झाल्यापासून देशभर रामनामाचा जागर सुरू आहे. रामनवमीच्या निमित्ताने मनोरंजन विश्वही राम रंगी रंगले आहे. 'गीत रामायण'च्या प्रयोगांसोबतच रामायणावर आधारलेल्या छोट्या पडद्यावरील मालिका लक्ष वेधत आहेत.
रामनवमीमुळे अवघे वातावरण राममय झाले आहे. एकीकडे ग. दि. माडगूळकर विरचित आणि सुधीर फडके यांनी संगीत स्वरबद्ध केलेल्या तसेच लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढलेल्या 'गीत रामायण'चे प्रयोग सुरू आहेत, तर दुसरीकडे टेलिव्हीजनच्या पडद्यावरही 'रामायण' मालिका पाहायला मिळत आहेत. नुकताच ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात श्रीधर फडके यांच्या आवाजात 'गीत रामायण'चा प्रयोग रंगला. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरामध्ये गायक अजित परब, हृषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या आवाजात माडगूळकर-फडके यांचेच 'गीत रामायण' सादर करणार आहेत.
टेलिव्हीजनवरील 'रामायण' मालिकाही प्रेक्षकांवर मोहिनी घालत आहेत. कोरोना काळात थोडक्यात दाखवण्यात आलेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे फेब्रुवारीपासून दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर पुर्नप्रसारण सुरू आहे. अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लाहिरी, अरविंद त्रिवेदी, संजय जोग, दारा सिंग आदींची भूमिका असलेल्या या मालिकेने १९८७-८८चा काळ गाजवला होता.
'श्रीमद रामायण' हि नवीन मालिका जानेवारीपासून सोनी टिव्हीवर प्रसारीत होत आहे. या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेत सुजय रेऊ असून, प्राची बन्सल सीतामाता बनली आहे. याखेरीज बसंत भट्ट, निर्भय वाधवा, निकीतीन धीर, आरव चौधरी, शिल्पा सकलानी आदी कलाकारही आहेत. स्वास्तिक प्रोडक्शन्सचे सिद्धार्थ कुमार तिवारी या मालिकेचे क्रिएटर आहेत.
झी टिव्हीवर गाजलेली हिंदी भाषेतील 'रामायण' मालिका झी टॉकिज आणि झी युवावर मराठीमध्ये पाहायला मिळत आहे. मालती सागर आणि मोती सागर यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत गगन मलिकने श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर सीतेच्या भूमिकेत नेहा सरगम आहे. नील भट्टने लक्ष्मणाची, तर सचिन त्यागीने रावणाची भूमिका वठवली आहे.
- बवेश जानवलेकर (मुख्य वाहिनी अधिकारी, झी टॉकिज, झी युवा, झी चित्रमंदिर)
अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येणाऱ्या रामनवमीमुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. या वातावरणात मालिकेच्या रूपात पुन्हा रामाचा महिमा प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस होता. त्यासाठी दोन-तीन महिन्यांपासून प्लॅनिंग सुरू होते. हिंदी मालिकेचे मराठीत डबिंग करण्यात आले असून, प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या झी टीव्हीवरील 'रामायण' मालिकेचे प्रसार करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हिंदीतील रामायण मराठीत प्रसारीत करण्याची संकल्पना सुचली.