Join us

एकच 'साहेब'... खास 'ठाकरे'साठी उघडलं दहा वर्ष बंद असलेलं टॉकीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 5:19 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला असून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिटरमध्ये या सिनेमाचा पहिला शो दिमाखात पार पडला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला असून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. पहाटे 4.15 वाजता वडाळ्यातील आयमॅक्स थिटरमध्ये या सिनेमाचा पहिला शो दिमाखात पार पडला. एवढचं नाही तर शिवसैनिकांसह सिनेरसिकांनीही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी गर्दी केली. एकीकडे राज्यभरातील थिएटर हाउसफुल्ल झाले. ठाकरे नावाचा दबदबा काय असतो, हे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाले. मुंबईतील गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेलं 'गिता टॉकीज' खास ठाकरे सिनेमाच्या मुहूर्तावर नव्याने सुरू करण्यात आलं. 

काही दुरूस्तीची कारणं देऊन बऱ्याच वर्षांपासून वरळी येथील हे टॉकिज बंद ठेवण्यात आलं होतं. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर हे टॉकिज याआधीही सुरू करण्यात आलं होतं. परंतु, त्यामध्ये फक्त ठराविकच चित्रपट दाखविण्यात येत असत. सुरू, बंदच्या खेळानंतर गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हे टॉकिज पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. अशातच, 25 जानेवारीचा मुहूर्त पाहून गीता टॉकीज पुन्हा सुरु करण्यात आलं. टॉकिज सुरू केल्यानंतर येथे सर्वात पहिला सिनेमा लावण्यात आला तो म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे'. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री अमृता राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण होते. अशातच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर बाळासाहेबांच्या भूमिकेला देण्यात आलेल्या आवाजावरून अनेकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यानंतर पुन्हा आवाज बदलून ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. याव्यतिरिक्त काही दिवसांपासून राजकीय रिंगणातूनही चित्रपटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आज चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. 

बाळासाहेबांवरील प्रेमापोटी 'ठाकरे' चित्रपटाचा मुहूर्त साधत हे टॉकीज सुरु करण्यात आलं असलं तरिही, यापुढे हे टॉकीज सुरु राहील का? याबाबत खात्री देण्यात आली नाही. काही वैयक्तिक अडचणीमुळे हे टॉकीज सतत बंद ठेवण्यात आहे. पण, 'ठाकरे' सिनेमा त्यासाठी अपवाद ठरला हे नक्की.

टॅग्स :ठाकरे सिनेमाबॉलिवूडनवाझुद्दीन सिद्दीकीअमृता रावसंजय राऊत