एनआयएच्या तपासातून उलगडा; जिलेटीन पुरविणाऱ्यासह वाहनचालकाचा शोध सुरू
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पार्क केलेल्या स्काॅर्पिओमध्ये निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेनेच जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र नेऊन ठेवले होते, हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून स्पष्ट झाले आहे. २४ फेब्रुवारीला रात्री सुरुवातीला त्याने कार पार्क केली आणि त्यानंतर पाठीमागे असलेल्या इनोव्हामधून उतरून हे कृत्य केले होते.
एनआयएच्या तपास पथकाने यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर धमकीचे पत्र शिंदेकडून मिळविले होते, असा उलगडा तपासाअंति झाला, तर ती स्काॅर्पिओ चालविणारा वाहनचालक आणि जिलेटीनच्या कांड्या पुरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंबानींच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर कारमायकलरोडवर २४ फेब्रुवारीला रात्री स्काॅर्पिओ पार्क केली त्यावेळी चालक पाठीमागील बाजूने बाहेर आला आणि मागे वाझे चालवित असलेल्या इनोव्हामध्ये बसला. त्यानंतर थोड्या वेळाने तेथे येऊन त्याने स्काॅर्पिओत पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या. ओळख लपविण्यासाठी त्याने कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधला होता.
त्यापूर्वी वाझेच्या सांगण्यानुसार मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड ऐरोली येथे तांत्रिक बिघाड झाल्याचे भासवून स्काॅर्पिओ रस्त्याच्या बाजूला लावली. हिरेन यांनी मुंबईला जाऊन गाडीची किल्ली सचिन वाझेला दिली होती आणि दुसऱ्या दिवशी त्याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यापूर्वी वाझेने ती गाडी एकाला तेथून घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार त्याने ती ठाणे येथील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पार्क केली. १९ फेब्रुवारीला स्काॅर्पिओ पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयात आणून त्यानंतर पुन्हा रात्री ती नेली. त्यानंतर २४ फेब्रुवारीला मुंबईत आणून कारमायकल रोडवर पार्क केली. त्यावेळी मागे वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा घेऊन होता. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर दोघे मुलुंड टोलनाका पार करत ठाण्याच्या दिशेने गेले.
काही वेळानंतर इनोव्हाची नंबर प्लेट बदलून वाझे पुन्हा आला व त्याने जिलेटीनच्या कांड्या आणि पत्र स्कॉर्पिओत ठेवले. त्यानंतर तेथून निघून गेला. बनावट नंबरप्लेट, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिठीत नदीत फेकल्या. याबाबी तपासातून उघड झाल्या आहेत.
–------------------
हजार तासाच्या फुटेजची सूक्ष्म तपासणी
तपासासाठी एनआयए व एटीएसने सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा आधार ठरला आहे. त्यासाठी मुंबई, ठाण्यातील सर्व प्रमुख मार्ग, नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. जवळपास हजार तासाचे फुटेजची सूक्ष्म तपासणी केली आहे. त्यातून या गुन्ह्याचा उलगडा झाला .