‘जेमिनी’ वाचवणार मच्छीमारांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:14 AM2019-11-16T00:14:42+5:302019-11-16T00:14:46+5:30
वादळाची माहिती, लाटांची उंची आणि हवामानाचा अंदाज इत्यादींची माहिती देणारे ‘जेमिनी’ तंत्र हे कोळी बांधवांसाठी उपयुक्त आहे.
मुंबई : वादळाची माहिती, लाटांची उंची आणि हवामानाचा अंदाज इत्यादींची माहिती देणारे ‘जेमिनी’ तंत्र हे कोळी बांधवांसाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामुळे मच्छीमारांचे होणारे आर्थिक नुकसान आणि जीवितहानी थांबण्यास मदत होणार आहे. जेमिनी तंत्र हे महाराष्ट्रातील ४ हजार बोटींवर बसविण्यात आले आहे. उर्वरित १० हजार मच्छीमारांनी याचा वापर करावा म्हणून राज्यभरात कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
केंद्रीय समुद्री मात्स्यकी अनुसंधान संस्थान (सीएमएफआरआय), भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (इकॉइस) आणि जी.एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स (तळा, रायगड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सागरी हवामान अंदाज’ आणि ‘गगन जेमिनी’ या तंत्रज्ञानावर वर्सोवा येथील सीएमएफआरआयच्या कार्यालयात भाष्य करण्यात आले. या वेळी इकॉइसचे शास्त्रज्ञ डॉ. निमित कुमार यांनी ‘जेमिनी’ तंत्राबाबत माहिती दिली.
जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य विजय सरोदे, केंद्रीय समुद्री मात्स्यकी अनुसंधान संस्थानच्या संचालिका डॉ. अनुलक्ष्मी चेल्लापन, मुंबई, वसई-पालघर आणि रायगड येथील मच्छीमार बांधव, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र बंदर विभाग, नेव्ही विभाग, तटरक्षक दल यांनी या वेळी उपस्थिती नोंदविली.
गगन सॅटेलाइटद्वारे जेमिनी तंत्रातून कोळी बांधवांच्या स्मार्ट मोबाइलवर समुद्रातील हालचालींची माहिती सहज उपलब्ध होईल. जेमिनी हे मोबाइलच्या ब्लु टूथद्वारे कनेक्ट होऊ शकते. मोबाइलमध्ये जेमिनी अॅप डाउनलोड करून घ्यावे. छोटेसे तंत्र बोटीच्या केबिनमध्ये कुठेही बसवता येण्यासारखे हलके आहे. सहा तास चार्जिंग केल्यावर ते तीन दिवसांपर्यंत चालू शकते. सध्या मच्छीमारांना टेस्टिंगसाठी मोफत देण्यात येणार आहे, असे निमित कुमार यांनी सांगितले.
मत्स्यव्यवसायाचे साहाय्यक आयुक्त एस.टी. वाटेगावकर म्हणाले की, ज्या ठिकाणी वादळ येते, तिथे मासेमारी करू नये. परंतु त्याच वादळाचा परिणाम इतर ठिकाणी जाणवत नाही. तिथे मच्छीमारांनी मासेमारी करायला पाहिजे. पण या वेळी होते असे की, वादळ कुठेही येवो, आपले मच्छीमार बांधव मासेमारी बंद करून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जेमिनी तंत्र हे महाराष्ट्रातील ४ हजार बोटींवर बसविण्यात आले आहे. उर्वरित १० हजार मच्छीमारांनी याचा वापर करावा म्हणून राज्यभरात कार्यक्रम आयोजित करून तंत्र घेण्यासाठी उद्युक्त केले जाईल.
>चक्रीवादळाची चेतावणी
हवामान आणि समुद्राचे क्षेत्रीय बुलेटिन, उष्णकटिबंधीय चक्रीवादळासाठी ४-स्टेप चेतावणी प्रणाली, पोर्ट चेतावणी सिग्नल, मच्छीमारांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये काय असते आणि चक्रीवादळाची चेतावणी कशी दिली जाते, या मुद्द्यांची माहिती मच्छीमारांसाठी सागरी सेवा या विषयाच्या सादरीकरणातून मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिली.
>संशोधन प्रणाली
सध्याच्या सागरी हवामानाचा विचार करायचा झाला तर समुद्रात विविध प्रकारच्या आपत्ती येत आहेत. त्यामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्यावर त्यांना योग्य ती सागरी हवामानाची माहिती त्यांच्या मोबाइलवर मिळाली तर त्यांचा जीव व त्यांची साधनसामग्रीही वाचू शकते. त्यामुळे मच्छीमारांना इकॉइस (हैदराबाद) यांनी विकसित केलेल्या संशोधन प्रणालीचा उपयोग व्हावा, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
>जेमिनी हे नवे आशेचे किरण मच्छीमार बांधवांसाठी तयार करण्यात आले आहे. आपण या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मग त्यातील काय समस्या आहेत, यावर लक्ष दिले पाहिजे. गेल्या पाच वर्षांत ३२ टक्के चक्रीवादळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वाढली आहेत.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग