शुक्रवारी रात्री जेमिनिड उल्कावर्षाव !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:04 PM2019-12-10T20:04:06+5:302019-12-10T20:04:13+5:30
मिथुन राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव खगोलप्रेमींना येत्या शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी रात्री निरीक्षण करता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितली.
मुंबई : मिथुन राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव खगोलप्रेमींना येत्या शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी रात्री निरीक्षण करता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितली.
या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, जेव्हा पृथ्वी एखाद्या धूमकेतूच्या मागार्तून जाते त्यावेळी उल्कावर्षाव पहायला मिळतो. परंतु यावेळी पृथ्वी ही फेथन ३२०० या लघुग्रहाच्या मागार्तून जाणार असल्याने उल्कावर्षाव पहायला मिळणार आहे. शुक्रवार १३ डिसेंबर रोजी रात्री मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात होणारा हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येईल. ताशी सुमारे २० उल्का पडताना दिसतील.
याच महिन्यात २६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण दक्षिण भारतातील कोईम्बतूर, उटकमंड इत्यादी ठिकाणांहून कंकणाकृती स्थितीमध्ये दिसणार आहे. अनेक खगोलप्रेमी ही कंकणाकृती स्थिती पहायला दक्षिण भारतात जाणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. महाराष्ट्रातून हे सूर्यग्रहण सकाळच्यावेळी खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. सूर्याचा सुमारे ७८ टक्के भाग चंद्रामुळे आच्छादिला जाणार आहे. सूर्यग्रहणाचे निरीक्षण करायला मिळणे ही देखील दुर्मिळ संधी असते.