'जेंडर एन आयडेंटीटी'चा प्रथम, तर 'द फियर फॅक्टर'चा द्वितीय क्रमांक
By संजय घावरे | Published: January 12, 2024 05:35 PM2024-01-12T17:35:54+5:302024-01-12T17:36:33+5:30
मुंबई - ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका संस्थेच्या ...
मुंबई - ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका संस्थेच्या 'जेंडर एन आयडेंटीटी' या नाटकाने प्रथम क्रमांकांच्या पारितोषिकावर नाव कोरले आहे. स्वराज्य फाउंडेशन मुंबई या संस्थेने सादर केलेल्या अमेय दक्षिणदास लिखित समीर पेणकर दिग्दर्शित 'द फियर फॅक्टर' या नाटकाने उत्कृष्ट नाट्यनिर्मितीच्या द्वितीय पारितोषिकासह चार पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे यांनी विजेत्यांच्या नावांची घोषणा करत 'जेंडर अॅन आयडेंटीटी' आणि 'द फियर फॅक्टर' या नाटकांची अंतिम फोरीसाठी निवड करण्यात आल्याचे जाहिर केले आहे. १६ डिसेंबर ते ८ जानेवारी या काळात गिरगावातील साहित्य संघ मंदिरामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत १८ नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या 'द फियर फॅक्टर' या नाटकातील मुग्धा या मध्यवर्ती भूमिकेसाठी बकूळ धवने हिला उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक जाहीर झाले आहे. याच नाटकाच्या नेपथ्यासाठी पंकज वेलिंग यांनी प्रथम, दिग्दशंनासाठी समीर पेणकर यांनी द्वितीय पुरस्कार आपल्या नावे केले. 'जेंडर अॅन आयडेंटीटी'साठी अमित वैती यांना उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहिर झाले आहे. दिग्दर्शनासाठी प्रथम पुरस्कार 'जेंडर अॅन आयडेंटीटी' या नाटकासाठी राजेंद्र पोतदार यांना, प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार 'एलिजीबीलीटी' या नाटकासाठी श्याम चव्हाण यांना, 'पुढच्या वर्षी लवकर या'साठी रजनिश कोंडविलकर यांना नेपथ्यासाठी द्वितीय पुरस्कार मिळाले आहेत. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक 'एलिजीबीटी'साठी राजेश परब यांना, तर द्वितीय पारितोषिक 'सखी उर्मिला'साठी आनंद एकावडे यांना घोषित झाले आहे. याखेरीज सविता चव्हाण, इशा कार्लेकर, सोनाली जानकर, भारती पाटील, मृदुला अय्यर, अमित सोलंकी, सुचित ठाकूर, सचिन पवार, महेंद्र दिवेकर, गौरव सातपुते यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळणार आहेत.