कोरोना वाढत असताना बोलावली महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:31 AM2020-06-13T00:31:36+5:302020-06-13T00:31:44+5:30

भार्इंदर पालिका : अट्टहास कुणासाठी?

The General Assembly convened while Corona was growing up | कोरोना वाढत असताना बोलावली महासभा

कोरोना वाढत असताना बोलावली महासभा

Next

मीरा रोड : कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच आयुक्तांचे अंदाजपत्रक अमलात आणण्याची तरतूद असतानाही महापालिकेच्या अंदाजपत्रकास महासभेची मंजुरी देण्यासाठी नगरसचिवांनी १६ जून रोजी विशेष महासभा बोलावली आहे. महापौरांच्या निर्देशानुसार ही सभा बोलावली असली तरी अंदाजपत्रकात फेरबदल करण्याचा प्रयत्न यामागे असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महासभा बोलावण्याचा अट्टहास कुणासाठी, असा सवालही केला जात आहे.

१६ मार्च रोजी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी महापालिकेचा २०२० - २१ चा मूळ व २०१९ - २० चा सुधारित अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर केले होते. एक हजार ६३४ कोटी ५५ लाख ९७ हजारांचे अंदाजपत्रक सादर करताना त्यात २७० कोटींचे नवीन कर्ज घेणे, तसेच सरकारकडून ५८० कोटी अनुदानाने मिळतील, असे अपेक्षित होते. दरम्यान, स्थायी समितीनेही त्यात वाढ करत स्वत:च्या मर्जीप्रमाणे तरतुदी व कामे वाढवली. २० मार्च रोजी स्थायीने अंदाजपत्रकास मंजुरी दिली. लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नावर झालेला विपरित परिणाम पाहता सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेस तसेच प्रशासनही काटकसरीची काटेकोर अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या मान्यतेने नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकास महासभेची मान्यता मिळावी या साठी १६ जून रोजी विशेष महासभा होणार आहे. पालिकेतील सभागृह लहान असून तेथे सामाजिक अंतर ठेवणे  शक्य होणार नाही. त्यामुळे महाजन सभागृहात सभा बोलावली आहे.

आयुक्तांचे अंदाजपत्रक ग्राह्य धरावे
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मार्चच्या ३१ तारखेपर्यंत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्वीकारले नाही, तर ते रीतसर स्वीकारण्यापर्यंत आयुक्तांनी तयार केलेले अंदाजपत्रक त्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय वर्षाचे अंदाजपत्रक मानले जाते. त्यातच यंदा उत्पन्न कमी झाल्याने खर्चात व अनावश्यक कामांमध्ये मोठी काटकसर करावी लागणार आहे. परंतु, आपल्या मर्जीनुसार अंदाजपत्रक अंतिम व्हावे, यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न असल्याने विशेष महासभा बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिवांशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. तर, शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे निधन झाल्याने ही महासभा तहकूब होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Web Title: The General Assembly convened while Corona was growing up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.