Join us

आमसभेत महावितरणच्या कारभारावर ताशेरे

By admin | Published: August 02, 2014 12:38 AM

पनवेल तालुका पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत आम आदमीच्या प्रश्नांचा पाऊस पडला आणि त्यावरही प्रदीर्घ चर्चा करण्यात आली

पनवेल : पनवेल तालुका पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत आम आदमीच्या प्रश्नांचा पाऊस पडला आणि त्यावरही प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. सर्वाधिक प्रश्नांचा भडिमार महावितरणच्या कारभारावर झाला. या व्यतिरिक्त एसटी आणि विमानतळाकरिता करण्यात आलेल्या भरावाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला पंचायत समितीचे सभापती गोपाळ भगत, नगराध्यक्षा चारूशीला घरत, तहसीलदार पवन चांडक, गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळाराम पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, हरेश केणी, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे यांच्यासह एसटी, पालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. कळंबोली वसाहतीत होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. तळोजा उपकेंद्रावर ओव्हरहेड वायर टाकून कळंबोली वसाहतीला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. कळंबोली वसाहतीत सुमारे २५ हजार ग्राहक नियमित वीज बिल भरत असताना त्यांच्या नशिबी अनियमित वीजपुरवठा का असा सवाल आमसभेत उपस्थित करण्यात आला. लवकरच अंडरग्राऊंड वाहिनी टाकण्यात येणार असून रोडपाली या ठिकाणी सबस्टेशन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप मेहेत्रे यांनी यावेळी दिली. ठिकठिकाणी ४ ते ५ सबस्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम सुप्रीमो या कंपनीला दिले असल्याचेही मेहेत्रे यांनी सांगितले. कळंबोलीत जे मीटर बसविण्यात आले आहेत ते दुसऱ्या राज्यातील रिजेक्ट वीजमीटर आहेत. ते खराब असून त्यामुळे ग्राहकांना जास्त बिल येत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. हे मीटर मुख्य कार्यालयातून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तरी सुध्दा ज्या ठिकाणी तक्रारी आहे तिथे तपासणी करण्यात येण्याची ग्वाही महावितरणच्या प्रतिनिधींनी दिला. ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या वायरीमुळे ग्रामस्थांचा जीविताला धोका असल्याचा विषयही आमसभेत उपस्थित करण्यात आला.या ठिकाणी दोन विजेच्या खांबामधील अंतर कमी करून हे प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पटेल मोहल्ल्यातील घरातच पाणी शिरल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. याबाबत त्वरित सर्व्हे करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये १ लाख प्रत्यक्ष २ लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या मिळणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बेलापूर आणि खांदा वसाहतीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर १८ ते ३५ वयोगटातील तरूणांचा सर्व्हे सुरू असून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.