लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाविरोधातील देशाच्या लढाईत मध्य रेल्वेचे योगदान कायम आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी नुकताच मध्य रेल्वेतील प्रधान विभागप्रमुख व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह ऑनलाईन चर्चा करून कोरोना सज्जतेचा आढावा घेतला.
कंसल यांनी ऑक्सिजन, औषधे, दैनंदिन गरज आणि हातातील साठा याविषयी चर्चा केली आणि मुंबई व इतर विभागातील रेल्वे रुग्णालयांच्या वैद्यकीय प्रमुखांना औषधे व कोविडशी संबंधित वस्तू कोणत्याही वेळी उपलब्ध असतील याची खात्री करून घेण्यास सांगितले.
सामग्री व्यवस्थापन आणि लेखा विभागांना कोविड संबंधित वस्तू आणि औषधांच्या गोष्टी आणि प्रस्तावांना प्राधान्याने प्राथमिकता देण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक यांना नियमितपणे रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकार आणि मुख्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढा म्हणून विशाखापट्टणम, अंगुल, हापा आदी प्लांटमधून देशभरातील विविध राज्यांत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पोहोचविण्यासाठी रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवित आहे. मध्य रेल्वेने प्रथम ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविली आणि ऑक्सिजन विशाखापट्टणम ते नागपूर आणि नाशिक रोड, हापा ते कळंबोली, मुंबई आणि अंगुल ते नागपूर अशी वाहतूक केली. महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे आतापर्यंत १४ टँकर ऑक्सिजन आणण्यात आले आहेत.
* लसीकरण करून घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन
निर्माण, परिचालन, अभियांत्रिकी आदी विभागांतील फिल्डमधील कर्मचारी व सर्व आरोग्य सेवा कर्मचारी (एचसीडब्ल्यू) आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता मुंबई विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलच्या भायखळा येथील अतिरिक्त लसीकरण केंद्राशिवाय कल्याण, ठाणे, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, इगतपुरी आणि लोणावळा येथे लसीकरण केंद्रे चालविली जात आहेत. लोणावळा आणि इगतपुरी लसीकरण केंद्रे मध्य रेल्वेच्या पुणे आणि भुसावळ विभागातही कार्यरत आहेत. अशीच लसीकरण केंद्रे नागपूर, सोलापूर, पुणे आणि भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयांत आहेत.
........................